Mon, Jun 17, 2019 03:28होमपेज › Pune › पालिका भवनासमोरील रस्त्याखाली पार्किंग 

पालिका भवनासमोरील रस्त्याखाली पार्किंग 

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 12:56AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात पार्किंगची खूपच कमी जागा असल्याने अनेकदा नगरसेवकांसह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना रस्त्यांवर वाहने लावावी लागत आहेत. त्यावर उपाय म्हणून भवनातील रस्त्याखाली म्हणजे तळघरात पार्किंग सुविधा विकसित केली जाणार आहे. त्याचा संपूर्ण खर्च महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड उचलणार आहे. त्या बदल्यात पालिका मेट्रोला भवनासमोर रस्ता पिलर उभारण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे.  

पुणे मेट्रोचे पिलर उभारणीचे काम मोरवाडी ते दापोडीपर्यंत वेगात सुरू आहे. मात्र, खराळवाडी ते मोरवाडी आणि नाशिक फाटा चौक ते कासारवाडीपर्यंतचा मार्गात मेट्रोने  बदल केला आहे. त्यामुळे दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग बाधीत होत आहे. त्याला आक्षेप घेत महापालिकेने बीआरटीएसमधील काम बंद पाडले आहे. मेट्रोने नवा आराखडा तयार केला असून, आता मेट्रोचे पिलर बीआरटीएसच्या बॅरिकेटसच्या बाहेर उभे केले जाणार आहेत. परिणामी, सर्व्हिस रस्ता आणखी अरूंद होणार आहे. 
सर्व्हिस रस्त्यावरील बीआरटीएसची स्वतंत्र लेन आणि अडीच मीटरचा मेट्रोचा पिलरमुळे तो आणखी अरूंद होऊन या रस्तामुळे वाहतुक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. हे काही प्रमाणात टाळण्यासाठी पालिका भवनासमोरील रस्ता वाहतुकीस खुला करण्याचा पर्याय पालिका प्रशासनाने दिला आहे. त्या बदल्यात मेट्रोने पालिकेसाठी रस्त्याच्या खाली म्हणजे तळघरात पार्किंग सुविधा विकसित करून देण्याची मागणी केली आहे. तशा, स्पष्ट सूचना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मेट्रो व्यवस्थापनाला दिल्या आहेत. 

त्यास मेट्रो व्यवस्थापनाने तत्वत: मान्यता दिली आहे. या संदर्भातील सादरीकरण मेट्रोचे अधिकारी मंगळवारी (दि.3) आयुक्तांच्या दालनात करणार आहेत. पालिका भवन आणि आवारात तळघरात पार्किंग व्यवस्था झाल्यास पालिका भवनासमोर रस्ता सार्वजनिक वाहतुकीस दिला जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोर म्हणजे मोरवाडी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकांपर्यंतचा सर्व्हिस रस्ता अधिक रूंद होऊन वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे पालिका अधिकार्यांचा दावा आहे. तर, पालिकेत तळघरात पार्किंगची मुबलक सुविधा उपलब्ध होऊन मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांचा पार्किंगचा गंभीर प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. परिणामी, रस्त्यावर वाहने लावणे बंद होईल, असे पालिका अधिकार्‍यांचे मत आहे.  

पालिका भवनाचे फाउंडेशन तपासून कार्यवाही

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाचे फाउंडेशन व बांधकाम तपासून रस्त्याखाली तळघरात पार्किंग बांधण्यात येणार आहे. त्यानुसार पार्किंगचे क्षेत्र ठरणार आहे. भवन इमारतीचे फाउंडेशन व बांधकाम मजबूत असेल तर, पार्किंग विकसित केले जाऊ शकते. त्यासाठी इमारतीच्या खाली व बांधकामाचे स्ट्रॅक्चर ऑडिट केले जाणार आहे. त्यानुसार पार्किंग क्षेत्र निश्चित केले जाईल.