Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Pune › शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापनही होणार ‘स्मार्ट’

शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापनही होणार ‘स्मार्ट’

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:19AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील रस्ते अधिक दर्जेदार आणि कार्यक्षम करण्यासाठी  पुणे स्मार्ट सिटीने ‘रस्ते संपदा व्यवस्थापनास (रॅम्स)  सुरुवात केली आहे. याद्वारे शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी नियोजन करणे शक्य होणार आहे, त्यानुसारअंदाजपत्रक तयार करण्यासही मदत होणार आहे.

शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी येतात आणि त्यासाठी पालिकेकडे रस्त्यांची इत्यंभूत माहिती एका ठिकाणी आणि ती वार्षिक स्तरावर उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शहरांच्या रस्त्यांची वार्षिक देखभाल करणे तसेच पालिकेच्या हद्दीलगतच्या रस्त्यांची दुर्दशा, वाया जाणारा खर्च, लांब पल्यांच्या रस्त्यांच्या तुलनेत रस्ते देखभालीसाठी कमी उपलब्ध असलेला निधी  आणि रस्त्यांच्या सर्वसाधारण जाळ्यांच्या देखभालीची दुरावस्था यांचा सुद्धा या अडचणींमध्ये समावेश आहे.  त्यावर आता  स्मार्ट सिटीच्या  ‘रॅम्स’ या प्रकल्पामध्ये रस्त्यां संबंधित सर्व इत्यंभूत परिस्थिती आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या माहितीचे संकलन  करण्यात आले आहे. सीसीटिव्ही कॅमेरे असलेली एक व्हॅनच त्यासाठी तयार करण्यात आली होती.

त्यातुन हे संकलन करण्यात आले आहे. या माहितीचा पालिकेच्या अभियंत्यांना  उपयोग व्हावा म्हणून इंटरनेटवर आधारित वेब टूल्स तयार करण्यात येणार आहे. तसेच रॅम्स प्रणालीचे दीर्घकालीन वापर होण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले जाणार आहे.  रॅम्सचा सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचा अत्याधुनिक अशा अभ्यास प्रकल्पाचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे,   याबाबत  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  राजेंद्र निंबाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये रॅम्सबद्दलची माहिती, त्याचा परिणाम आणि उपयोगिता याबाबत चर्चा झाली. 

रॅम्स बद्दल बोलताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप म्हणाले, पुणे स्मार्ट सिटीने केलेल्या सर्वात मोठ्या नागरिक सर्वेक्षणात वाहतुकीचा विषय सर्वांत प्राधान्याचा ठरला, त्यामुळे नागरिकांच्या वाहतुकीसंदर्भातील समस्या प्राधान्याने दूर करण्यास मोठी मदत होणार आहे.