Thu, Apr 02, 2020 15:23होमपेज › Pune › शहरातील नद्यांचे पात्र होतेय अरुंद

शहरातील नद्यांचे पात्र होतेय अरुंद

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:14AMपिंपरी ः पूनम पाटील

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरीकरणाचा फटका मात्र शहरातील नद्यांना बसत आहे. शहरात पवना, मुळा व इंद्रायणी या नद्या वाहतात. एकेकाळी शहराच्या जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नद्या मात्र मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आल्या असून दिवसेंदिवस त्यांचे पात्र कमी कमी होत आहे. पूर्वीच्या तुलनेत शहरातील नदिपात्र कमालीचे अरुंद झाल्याचे दिसून येत असून कालांतराने या नद्याच नामशेष होतील कि काय अशी भिती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

नदीकाठी अतिक्रमण वाढले असल्याने नद्यांचे पात्र आक्रसले आहे. तसेच शहरीकरणाच्या प्रक्रीयेत अंतर्गत भागात तर नद्यांना गटाराचे स्वरुप आले आहे. अतिक्रमण वाढल्याने पावसाळ्यात नद्याचे पाणी अतिक्रमण केलेल्या घरांमध्ये घुसतेे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखावे तसेच पूररेषा निश्‍चित करुन अनधिकृत बांधकामे रोखावीत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पालिकेचे दुर्लक्ष, नदिविषयी प्रेमच नाही. 

पिंपरी, चिंचवड, सांगवी, दापोडी तसेच शहरातील विविध भागात नदीकाठी अनेकांनी अतिक्रमण केले आहे. प्लॉटींगवाल्यांनी नदिकाठी असलेली जमीन विकल्याची माहीती पर्यावरणप्रेमींनी दिली. याबाबत महापालिकेक़डे वारंवार तक्रार करुनही महापालिका याकडे जाणून बूजून दुर्लक्ष करत आहे. त्यांमुळे नदिकाठी आक्रमण करणारे व पालिकेचे काही साटलोंट तर नाही ना असा सवाल सूजाण नागरीक करत आहेत. 

बदल्यांचे सत्र सुरू आहे, नंतर बघू, अधिकार्‍यांचे बिनधास्त वक्तव्य

तळवडे आयटीपार्कमधून जो रस्ता चाकण एमआयडीसी परीसरात इंद्रायणी काठी अनधिकृतपणे एक पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली असता आरोग्य विभागामार्फत पाहणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित भाग आमच्या कार्यकक्षेत येत नसल्याची व एमआयडीसीच्या ताब्यात येत असल्याची सबब देत हा विषय टाळण्यात आला. नदीपात्रात अतिक्रमण होउ द्या नाहीतर नदी गिळंकृत करु द्या हा भाग आमच्या ताब्यात येत नाही,  अशी सबब देत महापालिकेतर्फे नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तसेच याबाबत एमआयडीसीतील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी बिनधास्तपणेे या महिन्यात आमच्या बदल्यांचे वारे सुरु असतात. त्यामुळे मे महिना जाऊ द्या. त्यानंतर आम्ही कारवाई करणार असे उत्तर दिले. अशी परीस्थिती जर कायम राहीली तर कालांतराने नदिपात्रच गिळकृंत केले जातील अशी भिती पर्यावरणप्रेमीनी व्यक्त केली.  

इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा व अतिक्रमणाबद्दल कारवाई ही महापालिकेमार्फत केली जाते. याबाबत आमच्या विभागामार्फत फक्त पूररेषेचे नकाशे ‘डिमार्केशन’ करून पालिकेला दिलेले आहेत. त्या पुढील कारवाई त्यांनीच करायची आहे. नदीपात्रातील अतिक्रमण रोखणे व इतर कारवाई महापालिकेमार्फत केली जाते. क्षेत्रीय पाहणीच्या वेळी अशा गोष्टी निदर्शनास आल्यास त्याबाबत महापालिकेला कळवले जाते. त्याबाबत त्यांनीच कारवाई करायची आहेे. काही ठिकाणी महापालिकेतर्फेच ‘डंपिंग’ केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पूररेषा निश्‍चितीचे काम 2014 मध्येच पूर्ण केले आहे.  - हरीहर मुत्तेपवार, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, पुणे