Wed, Jan 16, 2019 09:25होमपेज › Pune › नद्या की वॉशिंग सेंटर

नद्या की वॉशिंग सेंटर

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:57PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-  चिंचवड शहरातील नद्यांकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आता  नद्या वाहने धुणार्‍यांसाठी वॉशिंग सेंटर बनू लागल्या आहेत. यामुळे दिवसेंदिवस नदी प्रदूषणात वाढ होत असून या नद्या गटारगंगा बनणार की  काय अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. 

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदी संवर्धनासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नद्या ‘वाशिंग सेंटर’ बनू लागल्या आहेत.  नद्याच्या वाढत्या प्रदुषणाने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथे वाहने धुणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढत असून त्यामुळे वाहनांची पर्यायाने नागरीकांची घरे वाढू लागली आहेत. त्यातच नदीपात्रात अतिक्रमण केल्याने नदीपात्रं लहान बनत चालली आहेत. त्यामुळे आधीच  पाण्याची पातळी कमी झाली असतांना नदीपात्रात कपडे धुणे, जनावरे धुणे, कचरा निर्माल्य टाकणे, उघड्यावर शौचास बसणे, कारखान्यांचे सांडपाणी सोडणे असे प्रकार सर्रास होत आहेत. त्यात आता सणवारांना दुचाकी चारचाकी तसेच ट्रॅव्हल्स व मोठमोठी अवजड वाहनेही नद्यांवर धुतली जात आहेत.

यामुळे नदी पाण्यात प्रदूषण वाढत असून जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  शहरात यापूर्वी नदी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु या पर्यावरणप्रेमींना हद्दीची कारणे सांगून महापालिका व संबंधित विभागांकडून सहकार्य करण्यात येत नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.