Mon, Jul 22, 2019 04:43होमपेज › Pune › बदलत्या जीवनशैलीमुळे अनियमित पाळीचा धोका

बदलत्या जीवनशैलीमुळे अनियमित पाळीचा धोका

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी 

सतरा वर्षांच्या स्मिताची पाळी नियमित वेळेपेक्षा लवकरच येत असल्यानेे तिची आई तिला स्त्रीरोगतज्ज्ञाकडे घेऊन आली. डॉक्टरांनी तिच्या दैनंदिन प्रक्रियेबाबत माहिती घेतली असता स्मिताचा घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे पदार्थ खाण्यावर भर दिसून आला. तसेच रात्री जास्त वेळ जागणे, अभ्यासाचा ताण आणि विशेष म्हणजे जेवणात सकस आहाराचा अभाव दिसून आला. सध्या या कारणांमुळे मुलींची आणि महिलांची पाळी अनियमित होत असून त्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के वाढल्याची माहिती तज्ज्ञ देतात.

सध्या मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होण्याचे आणि बीजांडामध्ये संप्रेरकांचा बदल होण्याचा आजार (पीसीओएस) वाढत आहेे. ग्रामीणपेक्षा शहरी भागातील मुलींमध्ये हे प्रमाण जास्त वाढलेले असून वेळीच काळजी न घेतल्यास वंध्यत्व येण्याचा धोकादेखील निर्माण झाला आहे. साधारणतः महिलांना दर 27 ते 28 दिवसांनी पाळी येणे आवशक आहे. मात्र, सध्या ही पाळी लवकरच म्हणजे 15 ते 16 दिवसांत येण्यापासून दोन ते तीन महिन्यांपर्यंत लांबतही आहे. तर मुलींमध्ये पाळी सुरू झाल्यानंतर वयाच्या अठरा वर्षापर्यंत हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो, अशी माहिती  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती गोलेचा यांनी दिली. 

जीवनशैलीतील बदल कारणीभूत

सध्याची बदललेली जीवनशैली आणि आहार या दोन मुख्य कारणांमुळे महिलांचे पाळीचे चक्र बिघडले आहे. जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव, बैठे काम, रात्री उशिरापर्यंत होणारे जागरण, खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी विश्रांती, ताणतणाव (स्ट्रेस) या कारणांमुळे पाळीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आहारामध्ये फास्ट फूडचे वाढलेले प्रमाण, तळलेले पदार्थ यांचे प्रमाण टाळून हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, फळांचे सेवन करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्‍त करतात. 

वंध्यत्वाचा धोका वाढला

बदलती जीवनशैली आणि आहारामुळे मुली आणि महिलांमध्ये ‘पॉली सिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम’ (पीसीओएस)चे प्रमाण वाढत आहे. बीजांडात  संप्रेरकांचे (हार्मोन्स) असंतुलन झाल्याने त्यामध्ये सीस्ट (पाण्याच्या गाठी) निर्माण झाल्याने सिंड्रोम होतो. यामुळे मासिक पाळीमध्ये अनियमितपणा, अंडाशय सुजणे, प्रजोत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा, पुरुषी बदल, त्वचेवरील वाढलेली लव व उपचार न केल्यास परिणामी वंध्यत्व येण्याचा धोका वाढला आहे. 

पाळी नियमित येण्यासाठी हे करा

नियमित व्यायाम 
मानसिक ताणतणाव व्यवस्थापन
संतुलित आहार ,वैद्यकीय सल्‍ला घ्या