Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Pune › ‘रिंगरोड’मध्ये वाचणार अडीच हजार कोटी

‘रिंगरोड’मध्ये वाचणार अडीच हजार कोटी

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:20AMपुणेः दिगंबर दराडे

पुण्याच्या रिंगरोडमध्ये तब्बल अडीच हजार कोटी रुपये वाचणार असून केंद्राने नवीन प्रकल्प खर्चाचा अहवाल मागविला आहे. पूर्वी पुणे महानगर प्राधिकरणाने प्रतिकिलो मीटरला 70 कोटी रुपये खर्च येईल असा अहवाल दिला होता. मात्र केंद्राने नव्याने अहवाल मागविला असून यामध्ये प्रतिकिलोमीटरला 40 कोटी रुपये खर्च करण्यास सूचविले आहे. यामुळे तब्बल अडीच हजार कोटी रुपये वाचणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्‍ते यांनी ‘पुढारी’बरोबर बोलताना दिली. 

मुंबईनंतर सर्वाधिक वेगाने वाढणारे मेट्रोपोलिटन शहर असलेल्या पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी व सेवा क्षेत्रात होणार्‍या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पुण्यात 128 किलोमीटरचा  रिंगरोड करण्यात येत आहे. या रिंगरोडच्या बांधकामाकरिता तब्बल साडेदहा हजार कोटी रुपये खर्च येणार होता. मात्र नवीन प्रकल्प अहवालानुसार साठेहजार कोटी रुपयांच्यामध्ये या रिंगरोडचे बांधकाम होणार आहे. सातारा रोड ते नगररोड या रिंगरोडच्या 33 किलोमीटरच्या पहिल्या टप्याकरिता  2468 कोटी रुपये लागणार होते. मात्र नवीन अहवालानुसार तब्बल पाचशे कोटींची बचत झाली आहे. हा टप्पा 1970 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार असल्याचे किरण गित्‍ते यांनी सांगितले.

हा रिंग रोड एकंदर आठ पदरी असेल. रस्त्याची रुंदी 110 मीटर असणार असून एकूण लांबी 128 किलोमीटर असेल. संपूर्ण रिंगरोडच्या दरम्यान छोटेमोठे 25 पूल बांधावे लागणार आहेत, तर सहा मोठ्या उड्डाणपुलांची निर्मितीही करावी लागणार आहे. रिंग रोडच्या दरम्यान काही ठिकाणी रेल्वेमार्ग येत असून या रेल्वेमार्गांवरून तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधावे लागणार आहेत. तसेच रिंगरोडच्या बाजूने सर्व्हिस रोडही बांधण्यात येणार आहेत. रिंगरोडमुळे संपूर्ण पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून अवाढव्य पसरलेल्या उपनगरांसहितच्या पुण्याला दळणवळणाच्या दृष्टीने सुटसुटीत करणारा हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणार आहे.  रिंगरोडमुळे पुण्यातील वाहतूक सुरळीत होणार असून, पुण्याच्या सीमारेषेवर असलेली प्रमुख ठिकाणे मुख्य पुणे शहराशी जोडली जाणार आहेत. पुणे शहरातील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे इंधनावरील खर्च कमी होणार असून वाहतुकीवरील खर्चात कपात होणार आहे. 

पुणे शहर व विमानतळ तसेच नव्याने होणारा पुरंदर येथील विमानतळही यामुळे जोडला जाणार असून लोकांना विमानतळावर पोहोचणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीए स्वतःच्या ताब्यातील जमिनीचीही विक्री करणार असल्याचे याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे. रिंग रोडचा मूळ प्रकल्प हा ’पीएमआरडीए’चा आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, भू-संपादनाची जबाबदारी ’पीएमआरडीए’ची राहणार असून, ’एनएचएआय’कडून दिला जाणारा निधी प्रत्यक्ष रस्ता बांधणीसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी ’पीएमआरडीए’च करणार आहे

काय आहे भारतमाला प्रकल्प?

भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी 5 लाख 35 हजार कोटी रूपयांच्या निधीला ऑक्टोबर 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा 70 टक्के खर्च सरकार करणार असून उर्वरित खर्च खासगी गुंतवणुकीतून करण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील 28 शहरांमध्ये वर्तुळाकार रस्ते करण्यात येणार असून त्यामध्ये पुणे, नागपूर, धुळे या शहरांचा समावेश आहे. मुंबईची मालवाहतूक सोलापूरमार्गे हैद्राबादला जाताना आणि नगररस्त्याने औरंगाबादला जाताना पुण्यात दोन ‘बॉटलनेक’ आहेत. कितीही राष्ट्रीय महामार्ग केले तरी ही वाहतूक नियंत्रणात येणे अशक्य आहे. त्याला वर्तुळाकार रस्ता हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एनएचएआयबरोबर भारतमाला परियोजनेतून हा प्रकल्प करण्यात येणार आहे.  - किरण गित्ते, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण