Wed, Apr 24, 2019 11:37होमपेज › Pune › मांजरीच्या वेशीवर ‘रिंगरोड’चा नारळ

मांजरीच्या वेशीवर ‘रिंगरोड’चा नारळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : दिगंबर दराडे

हवेली, मावळ, मुळशी आणि खेड या चार तालुक्यांना जोडणारा पुण्याचा महत्त्वाकांक्षी ‘रिंगरोड’ प्रकल्प आता सुसाट होणार आहे. प्रत्यक्षात या रिंगरोडच्या कामाला अवघ्या दहा ते पंधरा दिवसांत सुरुवात होणार आहे. 

पुणे महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात हवेली तालुक्यातील मांजरी येथून करण्याचे नियोजन पुणे महानगर प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.  या भव्य सोहळ्याला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एप्रिल महिन्यातच ‘रिंगरोड’चा नारळ फोडण्याचा चंग पीएमआरडीएने बांधला आहे. याकरिता पीएमआरडीएकडून युद्धपातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे.

मेट्रो, पुरंदर विमानतळ आाणि पुण्याचा रिंगरोड मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. प्रकल्पाची लांबी 128 किलोमीटर असून, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे 17 हजार 412 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. रिंगरोडसाठी अंदाजे 1 हजार 430 हेक्टर इतक्या जागेची आवश्यकता आहे. रिंगरोडमधील हवेली, मावळ, मुळशी व खेड या चार तालुक्यांतील 58 गावांमधील सुमारे 2 हजार 37 गटामधील जागेचा यात समावेश आहे. पहिला टप्पा मांजरी खुर्दतून सुरू होणार असून, तो नगररोडला जोडण्यात येणार आहे. यापाठोपाठ सातारारोडला रिंगरोड जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सातारा रोड ते नगररोड हे 32 किलोमीटरचे अंतर राहणार आहे. 

पीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आलेला रिंगरोड हा मुंबई महामार्ग-नाशिक रस्ता-नगर रस्ता-सोलापूर रस्ता आणि सातारा रस्ता या चार महामार्गांना जोडणारा आहे. हा रस्ता 110 फूट रुंद आणि 16 पदरी असून, यापैकी आठ पदरी रस्ता महामार्ग म्हणून, तर त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी चार पदरी रस्ता हा स्थानिक वाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. काही ठिकाणी बोगदे, काही ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. हा रस्ता ‘सिग्नल फ्री’ असणार आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडला मंजुरी देताना प्रस्तावित रस्त्यात धायरी, वडकीनाला आणि गहुंजे या तीन ठिकाणी बदल करण्यात आला आहे.

रिंगरोडमुळे पुण्यातील वाहतूक सुरळीत होणार असून, पुण्याच्या सीमारेषेवर असलेली प्रमुख ठिकाणे मुख्य पुणे शहराशी जोडली जाणार आहेत. पुणे शहरातील वाहतूक सुरळीत झाल्यामुळे इंधनावरील खर्च कमी होणार असून वाहतुकीवरील खर्चात कपात होणार आहे. पुणे शहर व विमानतळ तसेच नव्याने होणारा पुरंदर येथील विमानतळही यामुळे जोडला जाणार असून, लोकांना विमानतळावर पोहोचणेही सुलभ होणार आहे.

हा रिंगरोड दोन टप्प्यांमध्ये होणार असून, रिंगरोडच्या टप्पा एकसाठी 6063 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील या खर्चाची जबाबदारी, पीएमआरडीए - 934 कोटी रुपये, राज्य सरकार - 984 कोटी रुपये, जायका - 4095 कोटी रुपये अशी उचलली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात जायका - 4874 कोटी रुपये व नगररचना योजनेतून शिल्लक राहणार्‍या निधीतून 2418 कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत. एकंदर या प्रकल्पासाठी जायकाकडून (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) 8769 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य अपेक्षित आहे. या दोन्ही टप्प्यांचे काम जवळपास सात वर्षांमध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

 

Tags : pune, pune news, Ring Road project, work, manjri Haveli,


  •