Wed, Mar 27, 2019 00:12होमपेज › Pune › दौंडच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची आत्महत्या

दौंडच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची आत्महत्या

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:42AMदौंड ः

येथे गुरुवारी (दि. 1) दुपारी 3 ते 3.30 दरम्यान निसार जब्बार शेख याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निसार शेख हा माहिती अधिकारासाठी काम करत होता. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेलखान नासिरखान, नगरसेवक वसीम ईस्माईल शेख, माजी नगरसेवक ईस्माईल इब्राहीम शेख यांच्यासह 11 जणांवर दौंड पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दौंड शहरामध्ये मुस्लिम समाजात दोन गट निर्माण झालेले आहेत. मशिद व मदरसा यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या दोन्ही गटांत वाद चालू आहे. हे प्रकरण दौंड न्यायालयात चालू असून, गोपाळवाडी व लिंगाळी ग्रामपंचायत या दोन ठिकाणी इमदादुल उलुम युसुफिया या एकाच नावाने दोन मदरसा सुरू आहेत. त्यांचे पत्ते चुकीचे दाखवले आहे. प्रत्यक्षात ही मदरसा विश्‍वस्तांचे घरात आहे. याबाबतची माहिती मयत निसार जब्बार शेख याने माहिती अधिकाराद्वारे मिळवली व त्याबाबतची तक्रार धर्मादाय आयुक्त, पुणे व ग्रामीण पोलिस अधीक्षक, पुणे यांच्याकडे करून कारवाईची मागणी केली.

यामुळे निसार शेख या कार्यकर्त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेलखान नासिरखान, नगरसेवक वसीम ईस्माईल शेख, माजी नगरसेवक ईस्माईल इब्राहीम शेख, ताहेरखान, युसुफखान, शफिउल्लाखान, अहमदखान पठाण, फिरोज शफिउल्ला खान (पठाण), मौलाना अब्दुल रशिद अब्दुल रज्जाक, शेख दस्तगीर कादर शेख, उबेद बाबुमिया खान, अखलाक रहीम खान व तजमुल्ला काझी असे मिळून 11 जणांविरुध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निसार शेख यांच्या पत्नीने या 11 जणांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निसार जब्बार शेख याने आपल्याला आत्महत्येच्या कारणाचे मोबाईल व्हिडीओ रेकॉर्डिंग केले व चिठ्ठीही लिहून ठेवली होती. हे सर्व पुरावे आपल्या जवळच्या मित्रांना, दौंड पोलिस निरीक्षक, पोलिस अधीक्षक यांना पाठविलेले आहे. वरील 11 जणांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी निसार जब्बार शेख याने लिहिली व त्यात 11 जणांच्या नावांचा उल्लेख केला आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांना अटक करा; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत निसार जब्बार शेख याची पत्नी व समर्थक कार्यकर्त्यांनी घेतली आहे.