Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › रिक्षाचालक  खासगी सावकारांच्या विळख्यात

रिक्षाचालक  खासगी सावकारांच्या विळख्यात

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 28 2018 11:21PMपिंपरी : संतोष शिंदे

पिंपरी-चिंचवड शहरात खासगी सावकारीचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. यामध्ये रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात अडकले असल्याचे ‘पुढारी’ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकांना उसने पैसे देऊन त्यावर मनमानी व्याज उकळण्याचे मोठे रॅकेट शहरात सुरू आहे. इतक्या उघडपणे व्याजाचा धंदा सुरू असूनही पोलिसांना त्याची खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

पिंपरी - चिंचवड  शहरात रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वीस वर्षांपासून परमिट सुटले नसल्याने रिक्षाचालक परमिटधारकांकडून रिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर व्यवसाय करीत होते. मात्र  पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून शहरात 6  हजार रिक्षाचे परमिट देण्यात आले आहेत. त्यापैकी साडेचार हजार चालकांनी रिक्षा खरेदी केला आहे. केवळ बॅच असण्याच्या अटीवर परमिट देण्यात आल्याने सर्वसामान्यांची यामध्ये लॉटरी लागली. परमिट मिळाल्याने पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी रिक्षाचालकांनी धडपड सुरु केली. यावर नजर ठेऊन असणार्‍या खासगी सावकारांनी या संधीचा फायदा घेत परमिट मिळालेल्या चालकांना 10 ते 20 हजारांपर्यँत मनमानी व्याजाने पैसे देणे सुरु केले. रिक्षाचालकांकडून वेळेवर पैसे येऊन लागल्याने रिक्षाचालक या बेकायदा सावकारांची पहिली पसंती ठरू लागली आहेत. 

नुकतेच काही दिवसांपासून रिक्षाचालकांसाठी ’कार्ड सिस्टीम’ सुरु  केली आहे.  एखाद्या चालकास 10 हजार हवे असल्यास सुरुवातीला एक हजार रुपये ’कट’ केले जातात. उर्वरित 9 हजारांसाठी 50 दिवसांचे एक कार्ड तयार केले जाते. दररोज एक ठिकाण व वेळ ठरवून 250 रुपये जमा करुन घेतले जातात. पैसे जमा केल्यानंतर कार्डवर नोंद केली जाते. 50 दिवस 250 रुपयांचा भरणा केला असता 50 दिवसात  12 हजार 500 रुपये जमा होतात. 50 दिवसात 3 हजार 500 रुपये केवळ व्याजापोटी आकारले जातात. एक दिवस जर चालकाने पैसे भरले नाहीत तर लगेच वसुलीवाल्यांचे फोन सुरु होतात. अशा फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचे काम करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्यामुळे रिक्षाचालक त्यांच्या दबावापोटी पोटाला चिमटा काढून पैसे भरतात. सावकारांच्या या वसुली पंटरला उलट उत्तरे दिल्यास अनेक चालकांना मारहाण देखील करण्यात आल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले जाते. सकाळी आणि सायंकाळी ठरलेल्या ठिकाणी हे वसुली पंटर हातात पेन आणि डायरी घेऊन उभे असल्याचे पाहावयास मिळते.

5 वर्षापर्यंत कैद आणि 50 हजारपर्यंत दंड

परवानाधारकांनी नमूद पत्त्याव्यतिरिक्त किंवा कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणे, दुसर्‍याच्या नावावर सावकारी करणे, या बाबी आढळल्यास कलम 41 अन्वये पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षापर्यंत कैद किंवा 15 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. गुन्हा दुसर्‍यांदा किंवा त्यानंतर केल्यास 5 वर्षापर्यंत कैद आणि 50 हजार  दंड अशी शिक्षा होऊ शकते.कोरी वचनचिठ्ठी, बंधपत्र किंवा इतर प्रकारची कागदपत्रे घेतल्याचे निदर्शनास आल्यास 3 वर्षापर्यंत कैद किंवा 25 हजार दंड यापैकी एक किंवा दोन्ही शिेक्षेची तरतूद या कायद्यात केली आहे.