Mon, Jun 17, 2019 18:52होमपेज › Pune › रिक्षाचालकांचा गणवेशाला ठेंगा

रिक्षाचालकांचा गणवेशाला ठेंगा

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:52PMपिंपरी : प्रतिनिधी 

शहरात वाहतुकीच्या समस्यांनी नागरिक त्रस्त असून त्यात आता रिक्षाचालकांची भर पडली आहे. सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना गणवेश बंधनकारक असतानाही रिक्षाचालकांकडून मात्र या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे. शहरात सद्यस्थितीत बोटावर मोजण्याइतके रिक्षाचालक सोडले तर एकही रिक्षाचालक गणवेश घालत नसून सर्रास रंगीबेरंगी कपड्यात रिक्षा वाहतूक सुरू असून गणवेशाला ठेंगा दाखवला जात आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असून, त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरात विविध भागात तसेच चौकाचौकात रिक्षा चालकांचे थांबे आहेत.

परंतू यापैकी एकही रिक्षा चालक पुर्ण गणवेशात वावरत नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून नेमके रिक्षाचालक कोण आणि प्रवासी कोण असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. बहुतांशी रिक्षा चालक निर्धारित गणवेश वापरत नाही. तसेच रिक्षांचे मालक वेगळे आहेत, व भाडेतत्वावर रिक्षाव्यवसाय करणारे वेगळे आहेत. नवीन प्रवाशांना रिक्षाचालक कोण आहे, हे शोधावे लागत असल्याचे चित्र सध्या नजरेस पडत आहे. जवळपास नव्वदटक्के रिक्षाचालक खाकी रंगाचा शर्ट व पॅट हा गणवेश वापरतच नाही. काही रिक्षाचालकांकडे गणवेशच नाही अशी सबब सांगण्यात येत आहे. बहुतांश वेळा रिक्षाचालक हे प्रवाशांशी अरेरावीची भाषा करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. 

काही रिक्षा चालक केवळ ऑटो रिक्षा पासिंग व बॅजेस मिळवण्यापुरताच गणवेश घालत असून प्रत्यक्षात प्रवासी वाहतुक करतांना मात्र ना बॅज ना गणवेश, आम्हाला कोण काय करणार अशा अविर्भावात रिक्षा चालकांचे वागणे सुरु आहे. याबाबत वाहतुक पोलिसांनी गणवेश नसलेल्या रिक्षाचालकांना पावती फाडून तसेच समज देउन दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

गणवेश ही रिक्षा चालकांची ओळख आहे. परंतू या गणवेशालाच ठेंगा दाखवत साध्या कपड्यात रिक्षा वाहतुक करण्यात येत असून कोणीही कोणाचीही रिक्षा चालवू शकतो. त्यामुळे अपराधिक प्रकार घडण्याची भिती नागरीकांनी व्यक्त केली असून मागील काही घटना पहाता गणवेश व बॅज असेल तर रिक्षा चालकांवर विश्वास ठेवणे सोपे जाईल अशी आशा नागरीकांनी व्यक्त केली आहे.