Thu, Apr 25, 2019 07:59होमपेज › Pune › संघटनांची दुकानदारी रिक्षाचालकांच्या मुळावर

संघटनांची दुकानदारी रिक्षाचालकांच्या मुळावर

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:34PM

बुकमार्क करा
पुणे : नवनाथ शिंदे

शहरातील रिक्षा संघटनेच्या पदधिकार्‍यांकडून कार्यकर्त्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना राबविण्याऐवजी खिसे भरण्यात येत आहेत. त्यासाठी विविध थांब्यांवर उभे राहण्यासाठी हप्ता घेणे,  संघटनेची  विविध सण-उत्सवासाठी वर्गणी, आरटीओतील किरकोळ कागदोपत्री  कामकाजासाठी  पैशांच्या दुकानदारीमुळे रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत, तर दुसरीकडे केवळ आंदोलन आणि मोर्चांसाठी संघटनेतील कार्यकर्त्यांना हाताशी धरणार्‍या कामचलाऊ पदाधिकार्‍यांमुळे रिक्षाच्या व्यवसायाला ग्रहण लागले आहे.

संघटनेकडून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये समन्वयाची भूमिका पार पाडण्याऐवजी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून आरटीओ कार्यालयात वाहन परवाना, रिक्षा फिटनेस, ऑनलाईन परमिट मिळविण्यासाठी रिक्षाचालकांना किरकोळ मदत केली जात आहे. त्याबदल्यात 500 ते 3 हजारांपर्यंतची रोकड उकळली जात आहे. मागील काही महिन्यात स्वतःच्या स्वार्थासाठी आणि संघटनेच्या नावाखाली पैशांच्या लुटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरात 40 हजारांवर रिक्षा असून, परमिटच्या खुल्या धोरणामुळे 16 हजार रिक्षांची भर पडणार आहे. दिवसेंदिवस रिक्षांच्या संख्येत वाढ होत असताना संघटना आणि काही मग्रूर चालकांमुळे प्रवासी संख्या  घटत आहे.

त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांना आर्थिंक फटका बसत आहे. फक्त बोटावर मोजता येणार्‍या काही सघंटनेच्या वतीने रिक्षाचालकांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. इतर रिक्षा संघटना माल गोळा करण्याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाही. अवघ्या 5 ते 6 जणांना एकत्रित करून नेतेगिरीचा आव आणणार्‍या काही रिक्षा संघटनांच्या उच्छादामुळे रिक्षाचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरातील चौकाचौकातील रिक्षा संघटनांच्या थांब्यावर प्रवाशांच्या ने-आण करण्याबद्दल चालकांच्या मनात दुजाभाव तयार केला जात आहे. त्यामुळे खासगी वाहतूक व्यवसाय करणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. पदाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रिक्षा चालविणे, ठरवून आणि अडवून भाडे घेणे, मीटरला नकार देणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट भाषा वापरणे अशा प्रकारांमुळे संघटना रिक्षाचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती चालकांनी दिली आहे.

संघटनेच्या नावाखाली रिक्षाचालकांद्वारे राजकीय पोळी भाजून पैशांची देवाण-घेवाण वाढल्याची माहिती अनेकांनी दिली आहे. शहरातील अनेक भागात रात्रीच्यावेळी प्रवास करणार्‍या नागरिकांकडून रिक्षाचालकांनी जादा पैसे घेतल्याच्या तक्रारी आरटीओकडे प्राप्त आहेत. तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, संघटनेच्याविरोधात कमी पैशात भाडे करणार्‍या रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते, अथवा त्याला थांब्यावर उभे राहण्यास मनाई केली जात आहे. त्यामुळे संघटनांची दादागिरी रिक्षाचालकांना व्यवसायातून हद्दपार करण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांना आधार देण्याचा आव आणणार्‍या संघटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.