Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Pune › ‘महसूलमंत्र्यांनी मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा’

‘महसूलमंत्र्यांनी मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा’

Published On: Jan 25 2018 1:19AM | Last Updated: Jan 24 2018 10:53PMपिंपरी : प्रतिनिधी 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा मूळ बेळगाव सीमाप्रश्न सोडवून मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमप्रसंगी कर्नाटकचे स्तुतिगीत कन्नड भाषेत खुद्द महाराष्ट्राच्या महसूलमंत्र्यांनी गायल्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट होण्याकरिता झगडणार्‍या मराठी जनतेचा मोठा अपमान  आहे.

बेळगाव जिल्ह्यात मराठी लोकांचे स्पष्ट बहुमत, प्राबल्य असताना कर्नाटक राज्यनिर्मितीच्या वेळी लोकमताचा आदर न करता कर्नाटकात विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगावातील मराठी जनतेमध्ये शासनाच्या आडमुठ्या भूमिकेच्या विरोधात तीव्र असंतोष  आहे. गेल्या 50 वर्षांपासून बेळगावची मराठी जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. त्यात महसूलमंत्र्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केल्याने, तेथे राहणार्‍या मराठी जनतेच्या लढ्यावर एक प्रकारचा आघातच झाला आहे. 

कर्नाटक राज्यातील कोणत्याही निवडणुकीतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात; तसेच सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास; तसेच कर्नाटक राज्यविरोधी घोषणा दिल्यास थेट त्याचे पद आणि सदस्यत्वही रद्द करण्याबाबतचे भाष्य कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी 2017 रोजी बेळगाव दौर्‍यावर असताना केले होते. ज्या राज्यातील शासनाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणणेही गैर वाटते, त्याच राज्यात जाऊन महसूलमंत्री त्यांचे गोडवे गातात, हे कितपत योग्य आहे.