Fri, May 24, 2019 21:13होमपेज › Pune › निवृत्त पोलिस अधिकार्‍याचीच बदली!

निवृत्त पोलिस अधिकार्‍याचीच बदली!

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:59AMपुणे : देवेंद्र जैन

नुकत्याच झालेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यामध्ये प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी असतानाच पोलिस महासंचालक कार्यालयाने काढलेल्या आदेशातूनही गृह खात्याच्या अबू्रची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पोलिस अधिकार्‍यांच्या गेल्या वर्षी म्हणजेच 29 एप्रिल 2017 रोजी गृहखात्याने बदल्या केल्या होत्या. मात्र तब्बल 1 वर्षे 1 महिना 10 दिवसांनी म्हणजेच, 8 जून 2018 रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाने बदल्याचे आदेश जारी केले आहेत. या ‘लेटलतिफ’ कारभाराबद्दल संशय वाढला असून गृहखात्याच्या आदेशाचे पालन करण्यास पोलिस महासंचालक कार्यालयाने ऐवढा उशीर का केला, अशा प्रश्‍नही  उपस्थित केला जात आहे. 

दै.‘पुढारी’च्या 3 जूनच्या अंकात या बाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. गृह खाते व पोलिस अधिकार्‍यामध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे बहुतांश कार्यक्षम अधिकार्‍यांना याचा फटका बसत आहे. बदल्यांच्या यादीत 31 डिसेंबर  2017 रोजी चक्क निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे शहर आयुक्तालयात कार्यरत असलेल्या अधिकार्‍याचीही बदली पुणे पोलिस आयुक्तालयात करण्यात आली आहे. 

सरकारने 8 जून रोजी पोलिस उपअधीक्षक व उप विभागीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सरकारी कायद्याप्रमाणे पोलिस अधिकार्‍यांना दोन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा एकाच जिल्ह्यात करता येत नाही, असे असताना बर्‍याच अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन त्याच जिल्ह्यात कार्यरत केले आहे. या मागे स्थानिक राजकीय नेते असल्याचे बोलले जाते. अशा चुकीच्या बदल्यांमुळे पोलिस प्रशासनात मोठी नाराजी पसरल्याचे दिसून येते. याचाच प्रत्यय हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्या पत्रातून आला. ते पत्र संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाले आहे, सोशल मीडियावर या पत्राने नाचक्की झाल्यानंतरही सरकार मख्ख असल्याचे दिसून येते.शासनाच्या इत्तर विभागाने केलेल्या चुका समजू शकतो. पण, शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणार्‍या गृहखात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्यात अशा घोडचूका निषेधार्ह आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते मनिष भाले यांनी सांगितले.