Wed, Jun 26, 2019 18:00होमपेज › Pune › निवृत्त पोलिस अधिकार्‍यावर खुनीहल्ला

निवृत्त पोलिस अधिकार्‍यावर खुनीहल्ला

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 12:05AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

गणेशोत्सव काळात खंडणीसाठी धमकी दिल्याच्या कारणावरून  व पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरून निवृत्त पोलिस अधिकार्‍यावर चार जणांनी खुनीहल्ला केल्याची घटना वानवडी परिसरातील रामटेकडी येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मल्कीसिंग दुधाणी, उधलसिंग दुधाणी, अनिकेत गायकवाड आणि त्यांचा एक साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रामचंद्र घुले (वय 66, रा. सर्व्हेे नंबर 618, बिबवेवाडी, मार्केट यार्ड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र घुले हे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आहेत. सध्या  ते नाईक-नवरे डेव्हलपर्स यांच्याकडे सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. नाईक-नवरे डेव्हलपर्सचा प्रथम बांधकाम प्रकल्प रामटेकडी झोपडपट्टी परिसरालगत सुरू आहे. दुधाणी आणि त्याचे साथीदार गणेशोत्सवाच्या कालावधीत नाईक-नवरे डेव्हलपर्सच्या डेक्कन परिसरातील कार्यालयात गेले. त्यांनी तेथे धमकी देऊन खंडणीची मागणी केली. रामचंद्र घुले यांनी त्यांना खंडणी देण्यास  नकार दिला आणि डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या चौघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, रामचंद्र घुले हे गुरुवारी दुपारी रामटेकडी परिसरातील बांधकाम साईटवर गेले होते. त्यावेळी दुधाणी आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून त्यांना शिवीगाळ केली. हाताने आणि काठीने बेदम मारहाण करून त्यांच्यावर तलवारीने वार केले. त्यानंतर हे चौघे फरार झाले. घुले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.