Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Pune › किरकोळ विक्रेत्यांना ‘एफडीए’कडे नोंदणी आवश्यक

किरकोळ विक्रेत्यांना ‘एफडीए’कडे नोंदणी आवश्यक

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

चहा हॉटेल, स्नॅक्स व्यावसायिक, डबेवाले यांच्यापासून अन्नपदार्थांची  साठवणूक करणारे, मटणविक्रेते, फळविक्रेते व भाजीविक्रेते या सर्वांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए)  नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणी न केलेल्या व्यावसायिकावर व त्यांना अन्न पुरवठा करणार्‍या घाऊक व्यापार्‍यांवर दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’कडून स्पष्ट केले आहे. दरम्यान नोंदणीबाबत व्यावसायिकांमध्ये याची जागृती करण्यासाठी ‘एफडीए’कडून जागृती अभियान घेण्यात येत आहे.

अन्न व्यावसायिकांमध्ये याबाबत जागृती नसल्यामुळे पुणे ‘एफडीए’द्वारे जागृती अभियान लवकरच सुरू करण्यात येत असून त्यासाठी एमआयटी टेक्निकल कॉलेज, एसएनडीटी होम सायन्स, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट, श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अन्न व्यावसायिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांध्ये शिबिर घेऊन अन्न व्यावसायिकांची त्या शिबिरांमध्ये नोंद करण्यात येणार असल्याची माहिती ‘एफडीए’चे सहआयुक्त शिवाजी देसाई (अन्न विभाग) यांनी दिली.

इतकेच नव्हे तर पणन मंडळाचे संचालक यांच्याशी बोलणी सुरू असून त्यांच्याद्वारे फळविक्रेते, भाजीविक्रेते यांनाही नोंद करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्केटयार्डात शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिकांच्या संघटनांशीही संपर्क  करण्यात येत आहे. यामध्ये पथारी व्यावसायिक, जाणीव संघटना यांच्यासह त्यांचे नेते बाबा आढाव यांनादेखील संपर्क साधून त्यांच्याद्वारे व्यावसायिकांना याची माहिती देण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडूनही व्यावसायिकांची यादी घेऊन त्यांनाही नोंदणीकृत करण्यासाठी जागृती करण्यात येणार आहेत. येत्या 31 मार्चपर्यंत ‘परवाना नोंदणी महाअभियान’ चालणार असल्याची माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त एस. एम. देशमुख यांनी दिली.