होमपेज › Pune › ‘सेट’चा निकाल आणखी महिनाभराने?

‘सेट’चा निकाल आणखी महिनाभराने?

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 14 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात सहायक प्राध्यापक म्हणून विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन करण्यासाठी आवश्यक असणार्‍या राज्यस्तरिय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल लागण्यासाठी परीक्षार्थ्यांना आणखी एक महिना वाट पहावी लागणार आहे. सेट परीक्षा होऊन अडिच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी निकालाबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने परीक्षार्थी हवालदिल झाले होते. तर परीक्षेतील पात्रतेचे निकष बदलल्यामुळे निकाल जाहीर करण्यास वेळ लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यामुळेच राज्यातील पदव्युत्तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यांचा ही परीक्षा देण्यावर भर असतो. राज्यात सेटची परीक्षा 28 जानेवारीला पार पडली. त्यानंतर काहीच दिवसाने परीक्षेची पहिली उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर नियमाप्रमाणे परीक्षार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. त्यानंतर परीक्षेची दुसरी उत्तरतालिका जाहीर होईल, अशी परीक्षार्थ्यांना आशा होती.

मात्र, परीक्षेची पहिली उत्तरतालिका जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी देखील दुसरी उत्तरतालिका जाहीर झाली नाही. त्यामुळे परीक्षार्थी निकाल केव्हा लागेल, याबाबत हवालदील झाले आहेत. दरम्यान, यंदा झालेल्या परीक्षेत दोन्ही पेपरसाठी एकच ओएमआर उत्तरपत्रिका होती. तसेच, निकाल तयार करण्यासाठी नव्या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे निकाल तयार करण्यासाठी थोडा कालावधी लागत आहे. तर, दुसरी उत्तरतालिका थेट निकालच्या वेळीच जाहीर करण्यात येणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या परीक्षेला नोंदणी केलेल्या 78 हजार 312 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 699 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

निकाल ताळेबंद पद्धतीने तयार करण्यात येणार...

सेट परीक्षेचा निकाल तयार करताना राज्य सरकारने आरक्षणाबाबत तयार केलेल्या नियमावलीचा अभ्यास करण्यात येत आहे. यंदा परीक्षेचा निकाल हा नियमावलीनुसार तयार होईल. तर, निकालामध्ये चुका होतात, अशी परीक्षार्थ्यांची तक्रार असते. त्यामुळे निकालानंतर अनेक परीक्षार्थ्यांचा रोष सहन करावा लागतो. त्यामुळे निकालात चुका होऊ नये, यासाठी निकाल ताळेबंद पद्धतीने तयार करण्यात येत आहे, असे विद्यापीठ प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.