Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Pune › तीस रुपयांत चहा-नाश्त्याला प्रतिसाद

तीस रुपयांत चहा-नाश्त्याला प्रतिसाद

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी 

एसटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केवळ तीस रुपयांमध्ये चहा व नाश्ता या उपक्रमास अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जुलै 2016 मध्ये या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांत एक लाखाहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची आकडेवारी एसटीच्या वतीने देण्यात आली. एसटीच्या अधिकृत थांब्यांवर तीस रुपयांमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली, मेदू वडा यापैकी एक पदार्थ आणि चहा मिळत असून, महामंडळाची नाश्ता लूट थांबवणारी प्रवासी योजना असे तिचे नाव आहे. 

एसटीने प्रवास करताना प्रत्येक मार्गावर हा उपक्रम सुरू असून, नाश्त्याच्या वेळेस सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान त्याचा फायदा प्रवाशांना घेता येतो. प्रवाशांनी आपले तिकीट दाखविल्यानंतर एसटीच्या कोणत्याही अधिकृत थांब्यांवर त्यांना ही सवलत मिळू शकते, असे सांगण्यात आले. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर खालापूर फूड मॉल, लोणावळा येथे एनएच 4 सह सुमारे पन्नास ठिकाणी ही सवलत योजना सध्या सुरू असून, या थांब्यांच्या संख्येत आणखी वाढ करण्याचा विचार आहे, अशी माहिती एसटीच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, प्रवाशांव्यतिरिक्त अन्य सर्वांना नाश्ता व चहा घ्यायचा असल्यास त्यांना यासाठी 70 रुपये मोजावे लागतात, अशी माहितीही देण्यात आली. 

जादा दर मागितल्यास येथे कळवा 

प्रवाशांकडून अधिकृत थांब्यांवरील हॉटेल चालकाकडून जर तीस रुपयांपेक्षा अधिक दर आकारला जात असेल, तर त्याची माहिती राज्यातील कोणत्याही आगारात तातडीने कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 022-23075539 या क्रमांकावर सदर हॉटेलचे नाव प्रवाशाने सांगितल्यास, खातरजमा करून तेथील थांबा कायमचा रद्द होऊ शकतो, असे एसटीच्या सूत्रांनी सांगितले. अधिकृत थांब्यांवर सवलत हवी असल्यास प्रवाशांनी हॉटेल चालकाला तिकीट दाखवून सहकार्य करावे व आपल्या सहप्रवाशांना या योजनेची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.