Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Pune › लग्नसोहळ्यातील ‘मानापमान’ गेले कुठल्या थरापर्यंत

लग्नसोहळ्यातील ‘मानापमान’ गेले कुठल्या थरापर्यंत

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 11:20PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

मावळ तालुक्यात एका लग्नसोहळ्यामध्ये घडलेल्या गंभीर प्रकारामुळे लग्नसोहळ्यातील मानापमान कुठल्या  थरापर्यंत जावू शकतात याचा प्रत्यय आला असून आता खर्‍या अर्थाने यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पैसा, प्रतिष्ठा अन् ईष्यपायी अलिकडच्या काळात सोन्याचा तुकडा म्हणून ओळखल्या जाणार्‍या मावळ तालुक्यातील लग्नसोहळ्यांंध्ये मोठ्या प्रमाणात बदल होवू लागला असून पक्षीय अन् गटातटाचे राजकारण लग्नसोहळ्यांमध्येही होवू लागल्याने याचे परिणाम वधू-वरांच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत.

यापूर्वी साध्या पद्धतीने होणार्‍या लग्न सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, आता संपन्न होणारे लग्नसोहळे शाही स्वरुपात होवू लागले आहेत. अचानक आलेला पैसा, प्रतिष्ठा मिळवायची घाई अन् गावकी-भावकीत असलेली ईर्ष्या यामुळे खर्‍या अर्थाने दिवसेंदिवस लग्न सोहळ्यांचे रुप बदलू लागले आहे.

टिळा किंवा साखरपुड्यामध्ये वधूला औक्षण करण्यासाठी 20 ते 25 महिलांची नावे घेतली जातात, तर वराला औक्षण करण्यासाठी मान्यवरांची भली मोठी यादीच वाचली जाते. शुभ-विवाहप्रसंगी दोन्ही परिवारातील जावईबापूंचा सन्मान करण्यासाठी राजकीय मान्यवर तर उपस्थितांचे स्वागत व वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी ज्येेष्ठ राजकीय नेत्यांचाच उल्लेख केला जातो. हेच सोपस्कार पूर्ण करताकरता एखाद्या सुवासिनीचे किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीच्या नावाचा उल्लेख चुकून राहतो आणि याचा रोष संबंधित निवेदकावर काढला जातो. काही वेळा गावागावातील गटातटाच्या किंवा पक्षीय राजकारणामुळेही काही व्यक्तींची नावे घेणे जाणीवपूर्वक टाळले जाते आणि याचा परिणाम वादावादीमध्येही होतो.

असाच काहीसा प्रकार शनिवार (दि.26) रोजी नायगाव येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरु असलेल्या लग्नसोहळ्यामध्ये घडला. शुभविवाह संपन्न होण्यापूर्वी मानपान सुरु असताना स्वागत, आशिर्वादसाठी निवेदकाने राजकीय व्यक्तींची नावे घेतली आणि वादाला तोंड फुटले, याचा परिणाम थेट हाणामारीत झाला आणि दोन्ही गटातील 9 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला व अटकही झाली आहे तर काहीजण गंभीर जखमी झाले. दोन जीवांचा ऋणानुबंध जोडण्यासाठी संपन्न होत असलेल्या सोहळ्यामध्ये असा अनुचित प्रकार घडल्याने सहाजिकच याची झळ वधू-वरांच्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना बसते. मानापमानावरुन घडलेला हा प्रकार कुठल्या थरापर्यंत पोेचला याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हवे तर नावही घेऊ नका, पण हे थांबवा 

दरम्यान, या घटनेचे साक्षीदार ठरलेल्या आमदार संजय भेगडे यांनी याप्रसंगी शुभाशिर्वाद देताना यापुढे आम्हां राजकीय व्यक्तींची नावे पत्रिकेमध्ये टाकली नाही किंवा लग्नकार्यात पुकारली नाहीत तरी चालेल; परंतु हे कुठे तरी थांबवा अशी कळकळीची विनंती मावळवासीयांना केली.

मावळातही लग्नसोहळ्यांना आचारसंहितेची गरज?

मावळ तालुक्यात दिवसेंदिवस लग्नसोहळ्यांमध्ये होत असलेल्या शाही बदलामुळे अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढले असून, अनेक कुटुंबे केवळ ईर्ष्येपोटी कर्जबाजारी झाली आहेत. यातच आता असा गंभीर प्रकार घडल्याने हा डामडौल कुठेतरी थांबविण्याची गरज निर्माण झाली असून, काही दिवसांपूर्वी हवेली तालुक्यातील राजकीय नेत्यांनी एकत्र येवून एक आचारसंहिता बनवली आहे. त्याच धर्तीवर मावळ तालुक्यातील वारकरी सांप्रदाय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेवून लग्न सोहळ्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.