Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Pune › मेट्रो’बाबतच्या शंकांचे निराकरण संवादातून 

मेट्रो’बाबतच्या शंकांचे निराकरण संवादातून 

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:13AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

मेट्रोच्या बांधकामासाठी लागणार्‍या एकूण जागेपैकी 80 टक्के जागा सरकारची असून फक्त 20 टक्के जागा खाजगी मालकीची असणार आहे. मेट्रो ही लोकांसाठी असून त्यांना विस्थापित करून ती निश्‍चितच होणार नाही. गरज लागेल त्याच ठिकाणी खाजगी जागा मागण्यात येणार आहेत. लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे प्रतिपादन महामेट्रोचे तज्ज्ञ सल्लागार शशिकांत लिमये यांनी केले. 
महामेट्रोकडून आयोजित ‘संवादा’त ते बोलत होते. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आणि महामेट्रोचे ‘रिच वन’चे प्रकल्पाधिकारी गौतम बिर्‍हाडे आदी उपस्थित होते. 

मेट्रोसंबंधीच्या अनेक शंकांचे निरसन करून घेण्यासाठी महामेट्रोच्या या संवादाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मेट्रोचे बांधकाम कसे चालणार, निधी कसा आणि किती लागणार, कर्वे रोड व पौड रोड या परिसरातील काम करताना वाहतूक व्यवस्था कशी असणार आहे, या मार्गातील इमारती किंवा घरांचे पुढे काय होणार, असे अनेक प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यात आले. अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण लिमये यांनी संगणकीय सादरीकरणातून दिले.

शहरात मेट्रोच्या कामाला जसा वेग येत आहे, त्याच वेगाने नागरिकांना पडणार्‍या प्रश्‍नांमध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी महामेट्रोतर्फे जेथे काम सुरू होणार आहे, त्याच्या जवळच्या प्रभागांमध्ये संवादाचे आयोजन करण्यात येते. वनाज ते रामवाडी या मार्गावरील भागांमध्ये आत्तापर्यंत असे चार संवाद घेण्यात आले आहेत. प्रत्येक संवादाला पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. प्रभात रस्त्यावरील बालरंजन केंद्रामध्ये हा संवाद आयोजित करण्यात आला होता.