Sun, Jul 21, 2019 14:08होमपेज › Pune › छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव

छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी 

अहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत पालिका कर्मचार्‍याबरोबर बोलताना आक्षेपार्ह विधान करणारा अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव पुणे जिल्हा बार असोसिएशनने एकमताने मंजूर केला आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष राजेंद्र दौंडकर यांनी दिली. 

श्रीपाद छिंदम याने अहमदनगर पालिका येथील कर्मचार्‍याशी बोलताना शिवजयंतीच्या अनुषंगाने वाईट उद‍्गार काढल्याची तक्रार कर्मचार्‍याने कामगार संघटनेला दिली होती. त्यानंतर पालिका कर्मचार्‍याबरोबर छिंदम याची फोनवरील संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. पुण्यातही या घटनेचे पडसाद उमटले. या प्रकरणात छिंदमला अटक होऊन नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

कारागृहामध्येही इतर कैद्यांनी छिंदमला मारहाण केली होती. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणात छिंदम याचे अहमदनगर बार असोसिएशनने वकीलपत्र घेण्यास नाकारले. त्याच पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनेदेखील छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा  ठराव मंजूर केला आहे. नुकत्याच झालेल्या सभेमध्ये पुणे जिल्ह्यातील वकिलांनी छिंदम याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अ‍ॅड. दौंडकर यांनी दिली.