Thu, Jul 18, 2019 02:45होमपेज › Pune › मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:13AMकामशेत : वार्ताहर 

आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मावळच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूकप्रसंगी पक्षातील अंतर्गत बंडाळी समोर आली होती. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याचीही वाट न पाहता तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे राजीनामे पदाधिकार्‍यांनी तालुका अध्यक्षांकडे दिले आहेत. 

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी थांबवावी म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामशेत येथे झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यकत्यांना आवाहन केले की,  पक्षाच्या विरोधात कोणी काम केल्यास मला कळवा. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ज्या लोकांनी बंडखोरी केली अशा पाच जणांना तालुका पक्ष संघटनेनी सहा वर्षांसाठी निलंबित केले होते.

परंतु निलंबित बंडखोरांना अजित पवारांनी तालुक्यातील पक्ष पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता पुन्हा पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर कामशेतमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेमध्येही अजित पवारांनी सांगितले की, व्यासपीठावर असणारे सर्व लोक आपल्या पक्षाचे आहेत. त्यामुळे उपस्थित पदाधिकार्‍यांना अधिकार संपुष्टात आल्याची जाणीव झाली. वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असतानादेखील नगर पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पक्षाच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार न दिल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे सांगत तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. 

तालुक्यातील राजीनामे देणार्‍यांनी वरिष्ठांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. या संदर्भात रविवार (दि. 15) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष रमेश गायकवाड, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष  शुभांगी राक्षे , मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल केदारी, पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काळुराम मालपोटे, मावळ तालुका जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष छबुराव कडु , सहकार सेल अध्यक्ष सुभाष जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. तालुकाध्यक्ष गणेशअप्पा ढोरे यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा देत इतर पदाधिकार्‍यांचे राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले आहेत.