Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Pune › ‘इंद्रायणी’ला पुन्हा जलपर्णीची झालर

‘इंद्रायणी’ला पुन्हा जलपर्णीची झालर

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:39PM

बुकमार्क करा

मोशी : श्रीकांत बोरावके 

काही महिन्यांपूर्वीच पावसामुळे नदीच्या पुरात जलपर्णी वाहून गेल्याने इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेत संथ वाहत होती. परंतु, हा मोकळा संथ प्रवाह पुन्हा डबक्यासमान झाला असून या रसायनमिश्रित पाण्यात जलपर्णीचा विळखा वाढताना दिसून येत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून त्यात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. गतवर्षीप्रमाणेच पालिका काही दिवसात एखादा ठेकेदार नेमून जलपर्णी काढण्याचे काम करणार असेल तर ती या जलपर्णीवरची कायमची उपाययोजना ठरणार नाही. गतवर्षी या नदीतील जलपर्णी ही अतिवृष्टी व अवकाळी पावसातील पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली होती. त्यामुळे ती काढून टाकण्यासाठी पालिकेला अतिरिक्त तसदी घ्यावी लागली नाही. परंतु, यावेळेस इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी पूर्ण वाढ होऊ न देता लगेचच काढल्यास जलपर्णीसाठी करावा लागणारा लाखोंचा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्याकरिता कागदी घोडे न नाचविता तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या नदीपात्रातील जलपर्णी पूर्ण अवस्थेत वाढली नसून ती दिवासगणिक पसरत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेनेच याबाबत तत्काळ पाऊले उचलल्यास जलपर्णीच्या वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येणार आहे. नदीच्या पाण्यात चिखली येथील औद्योगिक कंपन्यांचे मैलामिश्रीत व रसायनयुक्त पाणी मिसळत असल्याने नदीतील जलपर्णी वाढीला खतपाणी मिळत आहे. त्यात या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह वाहता नसल्याने एकाच जागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास नदीकाठावरील चिखली, मोशी, डूडूळगाव, आळंदी या गावांना होत आहे. मोशी येथील गायकवाड वस्ती, आळंदी येथील तपकीरनगर परिसरात हा त्रास जास्त प्रमाणात जाणवत आहे.

जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यातून उत्पत्ती होणार्‍या डासांचा  उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वस्त्यांमधील अनेक मुलांना कांजिण्या आल्या असून कावीळ, उलट्या, जुलाब या आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एकंदरीतच इंद्रायणीतील जलपर्णी आसपासच्या गावांना त्रासदायक ठरत असून इंद्रायणी शुद्धीकरणाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असला तरी त्याबाबत योग्य  पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.