होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’मध्ये दिव्यांगांना आरक्षण द्यावे : बच्चू कडू 

‘पंतप्रधान आवास’मध्ये दिव्यांगांना आरक्षण द्यावे : बच्चू कडू 

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या आर्थिक दुर्लब घटकांसाठीचा गृहप्रकल्पामध्ये दिव्यांगांना आरक्षण ठेवून, त्यांना त्यांचा लाभ द्यावा. त्यानुसार नव्याने ‘डीपीआर’ तयार करून शासनाची मंजुरी घ्यावी. तसेच, पालिका प्रशासनाने दिव्यांगांना अधिकाधिक अर्थसहाय व सवलतीचा लाभ देऊन त्याचा उत्कर्ष साधावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी पालिकेकडे केली.

त्यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची भेट घेतली. या वेळी दिव्यांगासाठी काम करणारे शहरातील प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. आमदार कडू म्हणाले की, पालिकेने दिव्यांगांसाठी सुरू केलेली प्रतीमाह दोन हजार रूपये पेन्शन (अर्थसहाय) योजना चांगली आहे. पिंपरीत दिव्यांगांसाठी कल्याणकारी भवन उभारण्यात येत असल्याबद्दल त्यांनी पालिकेचे कौतुक केले. 

या भवनात दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सोई-सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, आवश्यक सुविधाबाबत सूचना व सल्ल्याची गरज असल्यास वेळ देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. 

आ. कडू म्हणाले की, दिव्यांगांसाठी विमा योजना राबविण्यात यावी. दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी निधी शासनाने 3 टक्कयांवर 5 टक्के वाढ केली आहे. तो निधी इतरत्र न खर्च करता 100 टक्के निधी दिव्यांगावरच खर्च करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने नियोजन करून वर्षभरात सदर खर्च कराव्यात. पालिकेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजनासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त आष्टीकर यांनी दिली. दिव्यांग कल्याणकारी भवनाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. तसेच, दिव्यांग पेन्शन योजनेसाठी अर्ज वाटप सुरू केले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनाचा निधी त्यांच्यासाठीच खर्च केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.