Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Pune › आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे : शरद पवार

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे : शरद पवार

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 7:20AMपुणे : वृत्तसंस्था

यापुढे जातीवर आधारित आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्‍त केले. जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. तासाभराच्या या मुलाखतीत पवार यांनी विविध प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली. 

वाचा : ‘पावर’बाज उत्तराची ‘राज’कीय कारकीर्द

प्रत्येक महापुरुषाकडे जातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. जातीजातीत जो कडवटपणा आलाय, तो कसा दूर होईल, असे विचारले असता पवार म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार, मराठी अस्मिता आणि राष्ट्राची अस्मिता अधिक बिंबवण्याची गरज आहे. तुम्ही ते कराल, कारण तुमच्यावर ते संस्कार आहेत. बाळासाहेबांनी कधीच जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहिलं. अशी अनेक माणसं उभी केली. सत्तेवर बसलेल्यांकडून फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय, प्रोत्साहन दिलं जातंय. पण हे फार दिवस टिकेल, असं वाटत नाही. महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही. तो शाहू-फुलेंच्या विचारानेच जाईल.

वाचा : महाराष्ट्रासाठी दिल्ली हातात हवी : शरद पवार

बीएमसीसीत शिकत असतानाच्या काळाबाबत राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना पवार म्हणाले, बीएमसीसीने अनेक बँकेचे प्रशासक निर्माण केले. नीरव मोदीला पैसे देणारे मात्र या महाविद्यालयाचे नव्हते, असे ते मिश्किलपणे म्हणाले.

खरे बोलल्याचा कधी त्रास झालाय का? या प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाले, खरं बोलणं हे चांगलं आहे; पण ते अडचणीचे ठरणार असेल, त्यामुळे कुणाचे मन दुखावणार असेल तर ते बोलता कामा नये, जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी काहीच केलं नाही, असे म्हणणे बेजबाबदारपणा आहे. दुसर्‍यांच्या विचारांचा सन्मान कसा करावा, याचा आदर्श अटलबिहारी वाजपेयींनी संसदेत घालून दिला, असे ते म्हणाले.

यावेळी झालेली प्रश्‍नोत्तरे अशी -

राज ठाकरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना अहमदाबादला नेतात. याबद्दल आपले मत काय?

शरद पवार : काही प्रमाणात झळ बसते, ही वस्तुस्थिती; पण महाराष्ट्रासाठी देश नेहमीच मोठा राहिलाय. देशाचं नेतृत्व करायचं असेल तर गुजरात आणि अहमदाबादचा अभिमान जरूर बाळगा. पण तुम्ही देशाचे नेते आहात, हे लक्षात ठेवा. ही भावना आज प्रत्येक सदस्याची आहे.

राज ठाकरे : पण हे आपला शिष्य ऐकतो का?

शरद पवार : मी कृषिमंत्री असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री. गुजरातमधील शेतीच्या विकासाचा विचार करणारे गृहस्थ होते. मुख्यमंत्री परिषदेत मोदी सतत तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर व्यक्‍तिगत हल्ला करायचे. ते कोणालाही पटायचं नाही; पण गुजरात हा देशाचा भाग आहे, हीच माझी भूमिका असायची. मी पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो असं मोदी म्हणाले. पण माझी करंगळी कधीही त्यांच्या हातात सापडली नाही. मोदींनी मला गुरूपण दिलं, त्यात काही अर्थ नाही. व्यक्‍तिगत  सलोखा आहे. 

राज ठाकरे : काँग्रेस-समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं आत-बाहेर करताना मनात काय असायचं?

शरद पवार : सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही काँग्रेसमधून झाली. नेहरू-गांधींची विचारधारा मी कधी सोडली नाही. मतभेद झाल्यामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला. शिंदेंनी माझ्यासोबतच काँग्रेस सोडली. परंतु, निवडणुकांनंतर शिंदेंसारखे नेते परत काँग्रेसमध्ये गेले. शिंदेंनी काँग्रेसची वीट कधी सोडली नाही.

रॅपिड फायर :

राज - इंदिरा गांधी की यशवंतराव? 
पवार - दोघंही 

राज - शेतकरी की उद्योगपती?
पवार - शेतकरी

राज - अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती?
पवार - उद्योगपती

राज - दिल्ली की महाराष्ट्र?
पवार - दिल्लीच !

राज -  काँग्रेस की भाजप?
पवार - काँग्रेस

राज - राज की उद्धव?
पवार - ठाकरे कुटुंबीय...!