Sat, Jul 20, 2019 08:43होमपेज › Pune › भोसरीत नाराज मूळ ओबीसींना ‘स्थायी’त संधी

भोसरीत नाराज मूळ ओबीसींना ‘स्थायी’त संधी

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 12:51AMपिंपरी : संजय शिंदे

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पालिका पदाधिकारी निवडीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील मूळ ओबीसी महापौरपदावर संधी न दिल्यामुळे नाराज होते. ही नाराजी परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये मूळ ओबीसींना संधी देण्यात आ. महेश लांडगे यशस्वी झाले आहेत; परंतु त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदी संधी  मिळणार का जुना मुंडे-गडकरी गट त्यांना यात शह देणार, अशी चर्चा पालिका व भोसरी विधानसभा मतदारसंघात रंगली आहे.

महापालिका निवडणुकीत महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले. महापौरपद आपल्या गटाकडे खेचून आणण्यात लांडगे यशस्वी झाले; परंतु मूळ ओबीसींना ते न देता कुणबी आरक्षणावर निवडून आलेले प्रभाग 3 मधील नगरसेवक नितीन काळजे यांना लांडगे यांनी विराजमान केले. काळजे यांना महापौर केल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील मूळ ओबीसींनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी परवडणारी नाही हे ध्यानात आल्यानंतर लांडगे समर्थकांकडून मूळ ओबीसींची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. 

पालिका पदाधिकारी निवडीच्या नियमानुसार स्थायीचे अध्यक्षपद आ. जगताप गटाकडे होते, ते आता आ. लांडगे गटाकडे सोपविण्यात येणार आल्याची चर्चा आहे; परंतु दि.20 च्या सर्वसाधारण सभेत सदस्य निवडीवरून एकमत न झाल्यामुळे दि.28 च्या सभेत नावे निश्चित करण्यात येतील, असे प्रदेशस्तरावरून जाहीर करण्यात आले. त्यानुसार आ. जगताप गटाला सुनिल अगोंळकर, ममता गायकवाड, आ. लांडगे गटाकडून राहूल जाधव, नम्रता लोंढे आणि निष्ठावंताकडून विलास मडिगेरी, शितल शिंदे यांना संधी देत सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न प्रदेश स्तरावरुन करण्यात आला आहे. 
स्थायी अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांच्या नावासाठी आ. लांडगे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निष्ठावंत गटाकडून विलास मडिगेरी किंवा शितल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. 

अध्यक्षपदासाठी लांडगे-भाजप निष्ठावंतांत स्पर्धा

सहा सदस्य निवडीवरून आ. लांडगे, आ. जगताप व भाजप निष्ठावंत यांच्यात स्पर्धा पाहावयास मिळाली; मात्र प्रदेशस्तरावरून सर्वांनाच समान संधी देत प्रत्येकाला प्रत्येकी दोन सदस्य देण्यात आले. या सदस्यांतून अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यामुळे आ. लांडगे आणि निष्ठावंत यांच्या समर्थकांमध्ये स्पर्धा होणार आहे. काही झाले तरी आपल्या समर्थकाला संधी देण्यासाठी आ. लांडगे जोर लावतील, तर निष्ठावंतांकडून विलास मडिगेरी किंवा शीतल शिंदे यांना स्थायी अध्यक्षपदावर बसविण्यासाठी पुन्हा निष्ठावंत एकत्र आले आहेत.