होमपेज › Pune › रिपब्लिकनचे ‘पब्लिक’ थंडावले

रिपब्लिकनचे ‘पब्लिक’ थंडावले

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:22AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आंबेडकरी विचारांवर चालत असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील दलितांचा या पक्षाला मोठा पाठिंबा होता; मात्र सध्याच्या भाजप सरकारच्या सत्‍तेत सहभागी झाल्यामुळे पक्षाने दलितांचा रोष ओढावून घेतला आहे. यंदा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आरपीआयच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले. चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासारख्या प्रबळ उमेदवारालाही अपयशाला सामोरे जावे लागले. सत्तेत असल्यामुळे विरोधात आंदोलन करण्याचीही अडचण होत आहे. पक्षाचे कार्यक्रमही होताना दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी रिपब्लिकन पार्टीचे ‘पब्लिक’ थंडावले असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आरपीआय पक्षाच्या आठवले गटाकडे सक्षम पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. पक्षाचे कार्यकर्तेही आक्रमक आहेत. दलितांवरील अन्यायाविरोधात आक्रमकपणे भूमिका घेत शहरात कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरत होते. शासकीय विभागांमध्ये पक्षाचा दबदबा आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने समाजातील बांधवांची कामेही त्वरीत करून दिली जात आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी पक्षाची मोठी ताकद मिळतेे. त्यामुळे थोड्या फरकाने या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला अपयशाला सामोरे जावे  लागले ; मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर खासदार व पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपसोबत हातात घालून जाण्याची भुमिका घेतली. या भुमिकेमुळे शहरात पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. शहरातील आंबेडकरी विचारांची जनता त्यांच्याविरोधात सूर काढत आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांनाही कोणतीच हालचाल करता येईना झाली आहे.

भाजपसोबत सत्‍तेत वाटेकरी झाल्यामुळे शहरातील आरपीआयकडे असणारा लोकांचा कल कमी होताना दिसत आहे. केवळ पदाधिकारी व त्यांना मानणारा गटच काम करून पक्ष जिवंत ठेवण्याची धडपड करताना दिसत आहे. पक्षामध्ये शिस्तीचा अभाव असल्याचे चित्र आहे. त्याचा तोटा होत आहे. पक्ष बांधणीकडे लक्ष देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांची शासकीय कार्यालयातील कामे करून देऊन पक्षाला जोडून घेत असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. पुर्वी वारंवार होणारी आंदोलनेही सध्या होताना दिसत नाहीत. 

खासदार आठवले सत्‍तेत असल्यामुळे सत्‍ताधार्‍यांविरोधात आंदोलने करताना कार्यकर्त्यांची द्विधावस्था होत आहे. माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब भागवत, सुधाकर वारभुवन, रमेश चिमुरकर आदींसह अनेक जण सध्या थंडावलेलेच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात एकेकाळी आठवले गटाच्या आरपीआय सोबत असणारी आंबेडकरी जनता पर्यायी समविचारी पक्षाचा विचार करत असल्याचे दिसून येत आहे.