होमपेज › Pune › बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाचा फेरप्रस्ताव स्थायी समितीने स्वीकारला

बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाचा फेरप्रस्ताव स्थायी समितीने स्वीकारला

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:02AMपिंपरी : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेतील बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या फेरप्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि. 8) झालेल्या सभेत मान्यता दिली. फेरप्रस्तावामुळे पालिकेचे केवळ 11 कोटी 30 लाख 55 हजार 559 रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण 112 कोटी 19 लाख 23 हजार 406 रुपये खर्चाला समितीने कोणतीही चर्चा न करता मंजुरी दिली. 
सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्षा ममता गायकवाड होत्या. पालिकेच्या वतीने शहरात गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत बोर्‍हाडेवाडीतील गृहप्रकल्पाच्या 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रूपये खर्चाचे काम  ठेकेदार एस.जे. कॉन्ट्रक्टसला देण्यास पालिका प्रशासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. हेे दर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा गृहप्रकल्पापेक्षा अधिक असल्याने फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीने 18 जुलैला आयुक्तांना दिले. 

बोर्‍हाडेवाडीत 1 हजार 288 आणि प्राधिकरणाकडून सेक्टर क्रमांक 12 येथे 2 हजार 572 सदनिका बांधण्यात येत आहेत. ठेकेदाराचा निविदेनुसार आणि इन्फ्रास्ट्रक्चर कामांचा समावेश करून पालिकेच्या प्रति सदनिका दर 9 लाख 99 हजार 465 रूपये आहे. तर, प्राधिकरणाचा प्रति सदनिका दर 8 लाख 25 हजार 148 रूपये आहे. पालिकेचा वाढीव दर 1 लाख 74 हजार 317 इतका आहे. कारपेट एरिआचा प्रति चौरस फूटाचा पालिकेचा दर 3 हजार 96 रूपये व प्राधिकरणाचा 2 हजार 599.54 रूपये आहे. तुलनेत पालिकेचा दर 496.46 रूपयांनी अधिक आहे. 
पालिकेची 14 तर, प्राधिकरणाची 11 मजली इमारत आहे. प्राधिकरण इमारतीसाठी भिंतीच्या प्लास्टरसाठी वॉलकेअर पुट्टीचा समावेश आहे. तर, पालिका जिप्सम प्लास्टरचा वापर करणार आहे. प्लास्टरचा

दर्जा बदल्याने पालिकेचा प्रति चौरस फुटाचा दर घटून 2 हजार 641.94 रूपये होणार आहे. तर प्रति सदनिका दर 8 लाख 53 हजार 143 इतका असणार आहे. त्यामुळे 11 कोटी 30 लाख 55 हजार रूपयांची बचत होणार आहे. नऊ लाख 99 हजार 465 रूपयांची सदनिका 8 लाख 53 हजार 143 रूपये दरात उपलब्ध होणार आहे. तरीही, हा दर प्राधिकरणापेक्षा 27 हजार 995 रूपयांनी अधिक आहे. 
या फेरप्रस्तावाला मान्यता दिल्याने आता त्यावर 112 कोटी 88 लाख खर्च होणार आहे. ‘डीपीआर’मध्ये बदल केल्याने राज्य व केंद्राची पुन्हा मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी किमान सव्वा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

चर्‍होली, रावेत गृहप्रकल्पाचाही फेरप्रस्ताव

प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाच्या दराशी तुलना केल्याने पालिकेचे बोर्‍हाडेवाडी प्रकल्पात साडेअकरा कोटींची बचत झाली आहे. या पद्धतीने चर्‍होली व रावेत येथील गृहप्रकल्पाचा दराचीही प्राधिकरणाशी तुलना करून फेरप्रस्ताव मागविला जाईल. त्यामुळे पालिकेची आर्थिक बचत होणार आहे, असे समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.