Sat, Jul 20, 2019 08:54होमपेज › Pune › खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

खासदारांचे रिपोर्ट कार्ड: थोडे झाले, थोडे करायचे आहे!

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 1:09AMकेंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. या सरकारमुळे सामान्य नागरिकांनी काय कमावले आणि काय गमावले, यावर सोशल मीडियापासून सर्वत्रच चर्चा होत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील खासदारांनी केलेली कामे आणि उर्वरित वर्षभरातील कामांसाठी केलेल्या संकल्पाचे ‘रिपोर्ट कार्ड’ त्यांच्याच शब्दात.

अनेक प्रकल्प मार्गी : खा. सुप्रिया सुळे

गेल्या चार वर्षांत केंद्रात वेगळ्या विचारांचे सरकार असतानाही बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचा पाठपुरावा करून, ती मार्गी लावली असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे- दौंड लोकलचा पाठपुरावा सातत्याने केला. त्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी रेल्वेमंत्री तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने बैठका घेतल्या. पुणे-दौंड रेल्वेमार्गातील कडेठाण, खुटबाव, मांजरी या स्थानकांवर प्लॅटफॉर्मसाठी निधी उपलब्ध केला. तीर्थक्षेत्र जेजुरी येथील रेल्वेस्थानकाचा विकास तसेच स्थानकावर पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही मोठा पाठपुरावा केला.

दौंड शहरात बीएसएनएलशी संबंधित अनेक प्रश्‍न होते. बारामतीतही काही ठिकाणी हा प्रश्‍न होता, परंतु मुख्यत्वे दौंडमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आत्महत्या केलेल्या मतदारसंघातील  शेतकर्‍यांच्या विधवा पत्नींच्या पुनर्वसनासाठी उमेद हा उपक्रम राबविला. या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहाय्य करण्यात आले. पुण्याच्या कचरा डेपोच्या प्रश्‍नात फुरसुंगी व ऊरुळी देवाची येथील ग्रामस्थांसोबत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा.

रायरेश्‍वर आणि रोहिडेश्‍वर किल्ल्यांसाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या माध्यमातून 1.61 कोटी व 1.31कोटींचा निधी मंजूर करून आणला. सांसद आदर्श ग्राम दापोडी येथे सौरऊर्जा व पवनचक्की प्रकल्पाचे काम पूर्ण केले. इंदापूरच्या न्यायालय इमारतीसाठी निधी. सिहंगड रोड येथील नदीपात्रालगतच्या रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा. आगामी काळात मतदारसंघातील डोणजे हे गाव ऐतिहासिक खेडे पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार.

20 हजार कोटींहून अधिक निधी आणला

शिरूर लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारमार्फत गेल्या 4 वर्षांत निरनिराळ्या प्रकल्पांसाठी सुमारे वीस हजार कोटींहून अधिकचा निधी मिळविण्यात यश आल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

पुणे-नाशिक रेल्वे मंजुरी- 5500 कोटी, राष्ट्रीय महामार्ग रस्ते कामांसाठी- 5711 कोटी, चांडोली ते सिन्नर महामार्ग चौपदरीकरण- 1970 कोटी, नाशिक फाटा ते चांडोली सहापदरीकरण- 978 कोटी, सरळगाव-बनकर फाटा-घोडेगाव-तळेघर-भीमाशंकर मार्गे वाडा-राजगुरुनगर महामार्ग करणे- 966 कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर-न्हावरा महामार्ग रुंदीकरण- 1800 कोटी, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-कळंब-आळेफाटा आदी गावांचा बायपास वगळता अंतर्गत महामार्गाची खास बाब म्हणून विशेष दुरुस्ती- 100 कोटी, केंद्रीय मार्ग निधीतून केदारेश्‍वर पूल, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ते व पुलांची कामे- 16 कोटी, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा खोल्या बांधणे- 3 कोटी 40 लक्ष निधी आणला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मिळवण्याकडे लक्ष देणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना, जीवनज्योती विमा, कौशल्य विकास योजना, मुद्रा योजना, पीक विमा आदी केंद्रीय योजनांची मतदारसंघात प्रभावीपणे अंमलबजावणी.

पुढील एक वर्षात पुणे-नाशिक लोहमार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रखडलेली बायपासची कामे, मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न. पुणे-शिरूर-नगर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आग्रही. पुणे जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अपंगांना विविध स्वरूपाचे साहित्य मिळावे यासाठी केंद्रीय योजनेअंतर्गत केंद्राकडून मदत मिळवून देणार.

बैलगाडा शर्यतीसाठी भक्कम कायद्याचा पाठपुरावा करू

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयात न्याय न मिळाल्यास शर्यती सुरू होण्यासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडून केंद्र सरकारकडे याबाबत भक्कम कायदा करण्याकरता पाठपुरावा सुरू ठेवणार आहे, असे आढळराव यांनी सांगितले.

नदी प्रदूषण आणि स्वस्त घरे याकडेच आता लक्ष

  पुणे - लोणावाळा रेल्वे ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाकडून मंजूरी मिळवून दिली. त्यानंतर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे ट्रॅकचा स्वर्हे सुरु झाला आहे. हा ट्रॅक सुरु झाल्यानंतर पुणे ते लोणावळा जलदगती रेल्वे सुरु होईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनीक वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.

  पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत पासपोर्ट कार्यालय सुरु केले. त्यामुळे या भागातील लोकांना पुणे शहरात जाण्याचा त्रास कमी झाला व चांगली सुविधा शहरात प्राप्त झाली. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच हिंजवडी, लोणावळा परिसरातील लोकांना सुविधा मिळाली. वर्षभरात सुमारे 32 हजार लोकांनी नव्याने पासपोर्ट काढले. 

  केंद्र सरकारच्या दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत ज्या दुर्गम भागात  स्वातंत्र्यानंतर वीज पोहचलीच नाही, अशा 5 गावांत वीज पोहचविली. या योजनेअंतर्गत मावळ, कर्जत, खालापूर, पनवेल या भागातील दुर्गम, आदीवासी भागातील वस्त्यांवर  वीज सुविधा मिळाली.

  पनवेल ते जेएनपीटी बंदर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या मार्गावर आठ पदरी रस्ता करुन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावला. 

  मावळ भागातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसह देहूरोड कॅन्टोन्मेंट आदी भागात पिण्याचे व शेतीचे पाणी पुरविणार्‍या पवना धरणातील सुमारे 21 हजार ट्रक गाळ खासदार

निधीच्या खर्चातून काढून पवना धरणाची पाणी क्षमता वाढविली. त्यामुळे यंदा पिंपरी-चिंचवडकरांना पिण्याची पाण्याची टंचाई झाली नाही. 

आगामी काळातील कामे 

 1) पवना नदी सुधार करण्यासाठी केंद्र सरकारचा आर्थिक निधी मिळवून नदीचे प्रदूषण दूर करणार व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे. 

2) केंद्र सरकारच्या योजनांमार्फत नागरिकांना स्वस्त दरातील घर मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. 

 3) चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर बंधूंवर टपाल तिकीट काढण्यासाठी पाठपुरावा केला असून त्याचे लवकरच अनावरण करणार आहे. 

मेट्रो व विमानतळ लक्ष्य

  स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा समावेश

  पुण्याच्या मेट्रोचे काम सुरू

  पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ

  लोहगाव विमानतळ विस्तारीकरणास एकर जागा

  चांदणी चौकाच्या पुलास मंजुरी, 450 कोटींचे काम

  लुल्लानगर, घोरपडी येथील रेल्वे ओव्हरब्रीजला मान्यता

  कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील बंद रस्ते सुरू

  पुण्याच्या विकासासाठी पीएमआरडीएची स्थापना

  विकास आराखड्याला मंजुरी

  नदीसुधार प्रकल्पाला मंजुरी

पुण्यासाठी दृष्टिक्षेपात

  वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार

  कचरा प्रश्‍न मार्गी लावणार

  लोहगाव विमानतळाचा रन वे वाढविणार