Mon, May 27, 2019 08:45होमपेज › Pune › ‘पीएमपी’च्या बडतर्फ कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घ्या

‘पीएमपी’च्या बडतर्फ कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घ्या

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:39AMपिंपरी : प्रतिनिधी 

किरकोळ कारणावरून पीएमपीएलच्या कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याची कारवाई अयोग्य आहे. संबंधित कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेऊन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची हिटरलशाही रोखण्याची आग्रही मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली. 

बुधवारी (दि.17) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. एक दिवस गैरहजर असणे, नेहमीचे काम सोडून इतर काम करण्यास सक्षम नसल्याचे किरकोळ कारण देत तुकाराम मुंढे यांनी त्यांना नुकतेच थेट बडतर्फ केले आहे. नियमित कर्मचार्‍यांना कामावरून कमी करत नवे कंत्राटी कामगार नियुक्त केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या समिती सदस्यांनी सभेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अध्यक्षा साळवे, सदस्य राजू मिसाळ, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे यांनी मुंढेंच्या एककल्ली व हिटलरशाही कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला. 

सेवानिवृत्तीस केवळ 6 महिने शिल्लक असलेल्या एका कंडक्टरला एक दिवस गैरहजर राहिल्याचे कारण देत बडतर्फ केले आहे; तसेच कंटक्टरला उपव्यवस्थापकाचे बसफेर्‍या ठरविण्याचे काम दिले आहे. नियमित काम सोडून अचानक अतिरिक्त व मोठ्या जबाबदारीचे काम दिल्याने कर्मचारी नीटपणे काम करू शकले नाहीत. शहरातील कर्मचार्‍यांची कात्रज व हडपसर असा दूरच्या अंतरावरील डेपोत बदली केली आहे. किरकोळ कारणांमुळे कामगारांना बडतर्फ करणे अयोग्य असल्याच्या भावना ढोरे यांनी व्यक्त केली. 

मुंढे हे मनमर्जी कारभार करीत असून, थेट कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्याची त्यांची पद्धत अयोग्य असून, या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याची आग्रही मागणी मिसाळ यांच्यासह सर्वच सदस्यांनी केली. अध्यक्षा साळवे यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात पीएमपीएलच्या संचालक मंडळाची बैठक त्वरित घेण्याबाबत मुंढे यांना पत्र लिहिण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली. 

बडतर्फ केलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेतली. या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायीच्या अध्यक्षा साळवे आणि नगरसेवक उपस्थित होते. कर्मचार्‍यांच्या भावना लक्षात घेऊन पदाधिकार्‍यांनी संबंधित कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याची आग्रही मागणी आयुक्तांकडे केली. या प्रश्‍नावर योग्य त्या कार्यवाहीबाबत तुकाराम मुंढे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी आयुक्तांनी ग्वाही दिली. या संदर्भात दोन पत्रे महापौरांनी पूर्वीच मुंढे यांना पाठविली आहेत.