पिंपरी : वर्षा कांबळे
मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृतीसाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून 28 मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून जाहीर केला आहे. मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकीन्स वापरण्यास उद्युक्त केले जाते. नॅपकिनच्या वापरामुळे मासिकपाळीतील स्वच्छतेचा प्रश्न मिटला असला तरी मात्र, सध्याच्या नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचा मोठा प्रश्न उभा आहे. त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकीला स्वत: घरीच नॅपकीन डिस्पॉजिबल करता आले तर प्लॅस्टिकची समस्या बर्र्यापैकी कमी होईल. हे लक्षात घेऊन प्रज्ञा शिंदेकर व विश्वास शिंदे या अभियंता विद्यार्थ्यांनी घरच्या घरी सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावणारे मशीन बनविले आहे.
त्या चार अवघड दिवसांमध्ये महिलांना आपले घर सोडून बाहेर कुठेही गेले की सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी सुविधा नसतील तर फार गैरसोयीचे होते. हल्ली सर्रास महिला व मुली यांना पॅड वापरणे सोयीचे वाटते. परंतु त्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न उभा राहतो. हे पाहिल्यावर प्रज्ञाला एक कल्पना सुचली की कमीत कमी खर्चात लहान क्षमतेची मशीन बनविली तर ती घरा घरांमध्ये जाऊ शकते. आणि घरातील तरुणी व महिला त्याचा उपयोग करू शकतात. आणि ही नॅपकीनची विल्हेवाट व प्लॅस्टिक कचरा या दोन्ही समस्या कमी होतील. यावर तिने संशोधन करण्यास सुरू केले. अभ्यासातून तिने घरगुती सॅनिटरी नॅपकिन डिस्पॉजिबल मशीन बनविले. ज्यात आपण एका वेळी दोन पॅड यामध्ये टाकू शकतो.
प्रज्ञाने बनविलेल्या मशीनमध्ये पॅड टाकल्यास पाच ते सात मिनिटाच्या आत संपूर्ण जळून शेवटी त्याची राख होते. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे कठिण असते. या नॅपकिन्सच्या बाबतीत संशोधन होऊन सहजगत्या विल्हेवाट लावता येतील, असे सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणे ही आव्हानात्मक बाब आहे. यासाठी विश्वास शिंदे या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांने सोलरवर चालणारे यंत्र बनविले आहे. अशाप्रकारे दोन्ही मशीनव्दारे मासिक पाळीच्या दिवसात शारीरिक स्वच्छतेबरेाबर परिसराचीही स्वच्छता राहिल.