Wed, Jul 17, 2019 20:21होमपेज › Pune › रिक्त जागा वेबसाईटवर प्रसिद्ध करा : अभय वाघ 

रिक्त जागा वेबसाईटवर प्रसिद्ध करा : अभय वाघ 

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी 

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पार पडलेल्या प्रवेश फेर्‍यानंतर रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असून, रिक्त जागांचा तपशील महाविद्यालयांना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व संस्थांना दिले आहेत. 

अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अंतिम ठप्प्यात आहे. या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित तीन प्रवेश फेर्‍या पूर्ण होत आहे. प्रक्रिया पार पडल्यानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रिक्त जागांची माहिती महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर भरण्यास परवानगी दिली जाते. 

महाविद्यालयातील संस्थास्तरावर किती जागा रिक्‍त आहे, त्याची माहिती पालकांसह विद्यार्थ्यांना प्राप्त होत नसल्यामुळे अनेकदा महाविद्यालयाच्या ठिकाणी जाऊन किती जागा आहेत, त्याची माहिती घ्यावी लागते. अनेकदा पालक आणि विद्यार्थ्यांची यामध्ये दमछाक होत असल्यामुळे सर्व संस्थांना त्यांच्या रिक्त जागा संकेतस्थळावर जाऊन प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार महाविद्यालयांना संस्थास्तरीय कोट्यातील जागा संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्या लागतील. संस्थास्तरावर प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जावरून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेश द्यावा लागणार आहे.