होमपेज › Pune › स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची अधिसूचना जारी

स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची अधिसूचना जारी

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:24AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार हे आता नक्की झाले आहे. यासाठी गृहविभागाने सोमवारी अधिसूचना (नोटिफिकेशन) काढली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलेल्या 15 ऑगस्ट पासून आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

शहराची वाढती लोकसंख्या, मोठ-मोठे गृहप्रकल्प, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या चार झोनमधील सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा परिसर, औद्योगिकरणामुळे देशातून आलेला कामगार वर्ग, आयटी हब, ग्रामीण भागात वाढत असलेले औद्योगिकरण या सगळ्यामुळे शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्‍लायाची गरज असल्याची अनेक वर्षापासून मागणी होत होती.

याबाबत पोलिस महासंचालकांनी दि. 21 जुलै 2016 रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर वेळावेळी याबाबत मुंबईत बैठका झाल्या. अलिकडेच दि. 27 फेब्रुवारी 2018 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पिंपरी-चिंचवड  पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्याबाबत बैठक पार पडली. बैठकीत नवीन आयुक्‍तालय सुरू करण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळाबाबत चर्चा झाली. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी तब्बल 2 हजार 633 पदे नव्याने निर्माण करावी लागणार असून ती टप्प्याटप्प्याने भरण्यास देखील मान्यता दिली. नवीन पदे निर्माण करण्याबाबतचा दिलेल्या प्रस्तावाला दि. 10 एप्रिलला मान्यता देण्यात आली. राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. त्यामध्ये 14 पोलिस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयासाठी नियुक्‍ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पोलिस ठाण्यांचा समावेश

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात पुणे शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड, पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी आणि चिखली या पोलिस ठाण्याचा, तर पुणे ग्रामीणच्या चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी या पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.