Tue, Jul 16, 2019 22:41होमपेज › Pune › टेम्पल रोझ फसवणूक प्रकरण

लेखापरीक्षकासह पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:07AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

भूखंड नावावर करण्याच्या आमिषाने तब्बल 4 हजार गुंतवणूकदारांची 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा.लि. कंपनीचा लेखापरीक्षक आणि त्याच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी फेटाळला आहे.  

धर्मेश नरेंद्र जोशी, त्याची पत्नी शर्मिला असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या दांपत्याचे नाव आहे. ही घटना 5 जुलै 2013 ते 19 मार्च 2017 या कालावधीत शिवाजीनगर आणि पाषाण भागात घडली. टेम्पल रोझसह नऊ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास भूखंड नावावर करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत 2 कोटी 13 लाख 55 हजार 673 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

एकूण चार हजार गुंतवणूकदारांची 300 कोटींची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कंपनीचा मुख्य संचालक देविदास गोविंदराम सजनानी (67, रा. मुंबई), रमेश जियंदमल अघीचा (57, रा. रहाटणी), सुनील दादा गाजी (51, रा. औंध), मुस्तफा जैनुद्दीन रामपुरवाला (47, रा. गुलटेकडी), मार्क्स योहान थोरात (रा. ठाणे) आणि केशव नारायण इदिया (रा. मुंबई) या सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

देविदास याची मुलगी दीपा, पत्नी वनिता या दोघींवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात धर्मेश आणि त्याच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी विरोध केला. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.  टेम्पल रोझने  पिंगोरी या गावात 440 एकर घेतलेली जमीन  शर्मिला आणि 11 जणांच्या नावे करण्यात आल्याचे खरेदीखत मिळाले आहे. याबाबत तपासासाठी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, अशी मागणी हांडे यांनी केली.