पुणे : पांडुरंग सांडभोर
स्मार्ट सिटी योजनेत देशात दुसरा क्रमांक मिळविणारे पुणे आता पिछाडीवर पडले आहे. या योजनेंतर्गत केंद्राने दिलेल्या निधीतील 75 टक्के रक्कम खर्च होणे अपेक्षित असताना केवळ 20 टक्केच निधीचा वापर झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत दुसर्या टप्प्यातील 98 कोटींचा निधी देण्यास केंद्राने स्पष्ट नकार दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर शहरे विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात दहा शहरांची निवड झाली. त्यात पुण्याने दुसरा क्रमांक मिळवित पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळविला होता. मोदींनी पुण्यात येऊन या योजनेचा शुभारंभ केला. त्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (पीएससीडीसीएल) या कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला आघाडीवर असलेले पुणे आता मागे पडले असून ‘पीएससीडीसीएल’च्या कामकाजावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
निधी खर्च करण्यात अपयशी
पुणे स्मार्ट सिटीच्या कामकाजावर केंद्राने नाराजी व्यक्त करण्याचे कारण ठरले आहे, ते निधी खर्च करण्यात ‘पीएससीडीसीएल’ला आलेले अपयश. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 196 कोटी, राज्य शासनाकडून 98 कोटी आणि महापालिकेकडून 101 कोटी असा जवळपास 395 कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आला. मात्र, ‘पीएससीडीसीएल’कडून हा निधी खर्च होऊ शकलेला नाही.
दुसर्या टप्प्यातील निधीस नकार
यासाठी औंध-बाणेर-बालेवाडीची निवड झाली आहे. त्या ठिकाणी काही योजना आणि प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी कंपनीने दुसर्या टप्प्यात 98 कोटींच्या निधीची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, हा निधी देण्यास केंद्राने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
Tags : Pune, Pune News, Pune Smart City, funding,