होमपेज › Pune › पुनर्वसन सर्वात मोठे आव्हान

पुनर्वसन सर्वात मोठे आव्हान

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:57AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील कोयना प्रकल्पापासून अनेक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. परिणामी हा आकडा मोठा आहे, कोयना प्रकल्पातीलच 18 हजार कुटुंबे पुनर्वसनाच्या आशेवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीपुढील सर्वात मोठे आव्हान असणार असल्याचे मत समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
विदिशा विचार मंचच्या वतीने भाजपचे मुख्य प्रवक्ते भंडारी यांची प्रकट मुलाखत रविवारी (दि.6) आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील ज्येष्ठ सनदी लेखापाल सर्वेश जोशी, सनदी लेखापाल सुरेश रानडे आणि मनोहर कोलते उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, चार पिढ्या जेथे गाव वसलेले असते, त्यांना बेघर करून त्यांचे पुनर्वसनही रखडवायचे ही शासकीय यंत्रणेची मोठी उदासीनता आहे. कोयना, गोसीखुर्द प्रकल्प, सातार्‍याजवळील चांदोली अभयारण्य अशी अनेक उदाहरणे देता येतील की, ज्या प्रकल्पांमुळे  गावे विस्थापित झाली. प्रकल्पांमुळे विस्थापित होणार्‍यांच्या संख्येचा आढावा घेतला तर तो सुमारे 55 लाखांच्या घरात जातो. आज 68 वर्षे होत आली; परंतु विस्थापितांचे पुनर्वसन रेंगाळले आहे. पुनर्वसनात होणार्‍या अशा दिरंगाईमुळेच सरकारच्या विकास प्रकल्पांना विरोध होतो. नाणार प्रकल्पाला होणारा विरोध हा याच कारणांमुळे असू शकतो. 

नाणारच्या बाबतीत मात्र नव्या सुधारित कायद्यान्वये जमीन संपादन होणार असल्याने त्याचे थेट फायदे जमीनमालकांना मिळतील, यात शंका नाही. अलीकडे प्रकल्पग्रस्तांची तोंडदेखली बाजू घेऊन संघर्षासाठी संघर्ष अशी भूमिका घेतली जाते. विदिशा विचार मंचाच्या संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी ही मुलाखत घेतली, तर योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले.