Wed, Mar 27, 2019 06:11होमपेज › Pune › आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आता नियमित तपासणी

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आता नियमित तपासणी

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील सरकारी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होऊन त्यांना त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आश्रमशाळांसाठी, आयुष डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. कळवण, तळोदा, धुळे, यावल, नंदुरबार, राजूर, किनवट, पांढरकवडा, धारणी, कळमनुरी, नागपूर, गडचिरोली, अहेरी, भामरागड या प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या 301 आश्रमशाळा व 8 एकलव्य निवासी आश्रमशाळेतील 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या सुविधा मिळणार आहे.

राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेले आहेत. यासंदर्भात रवींद्र तळपे यांनी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या होणार्‍या मृत्यूच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आश्रमशाळांमध्ये निवासी सुविधा व इतर मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश दिले होते. याचिकेच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. सुभाष साळुंखे समितीच्या शिफारशींद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, आदिवासी भागातील रिक्त पदे तसेच दुर्गम भागात या शाळा असल्याने या योजनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना नियमित आरोग्य सुविधा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, आजारी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, आपत्कालीन परिस्थितीत आश्रमशाळांत त्वरित उपचार उपलब्ध करुन देणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्यविषयक नोंदी असणारे आरोग्य पत्रिका तयार करणे, विद्यार्थ्यांत आरोग्यदायी अंगिकारण्यासाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित करणे, यावर भर दिला जाणार आहे. या योजनेवर पुढील 3 वर्षात जवळपास 53 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

यासाठी राज्यातील आश्रमशाळांचे 48 क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. एका क्लस्टरसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टरची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच या योजनेच्या कार्यवाहीसाठी प्रत्येक आश्रमशाळेत शाळा आरोग्य समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत मुख्याध्यापक, डॉक्टर, पालक यांना नियुक्त केले जाणार आहे. प्रकल्पाच्या शाळा स्तरावर अंमलबजावणीसाठी समिती मदत करणार आहे. सहा वर्षाच्या संघर्षानंतर सरकारने ठोस पाऊल उचलले आहे.