होमपेज › Pune › नियमबाह्य पदव्यांचे ‘आदर्श’कडून वाटप

नियमबाह्य पदव्यांचे ‘आदर्श’कडून वाटप

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:41AM

बुकमार्क करा
पुणे : गणेश खळदकर

अभ्यासक्रमांसाठी आवश्यक संबंधित शिखर संस्थांची परवानगी न घेता शहरातील आदर्श शिक्षण मंडळी या संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन या विभागामार्फत मास्टर प्रोग्राम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन- एमपीबीए हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम 1989 पासून राबविण्यात येत आहे. तसेच इन्स्टिट्यूटच्याच नावाने पदव्या दिल्या जात असल्याचे उच्च शिक्षण विभाग तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाने शासनाला पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे.

आदर्श शिक्षण मंडळी या व्यवस्थापनाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन या विभागामार्फत 1989 पासून आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मास्टर प्रोग्राम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन एमपीबीए या अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची किंवा एआयसीटीई या शिखर परिषदेची मान्यता घेण्यात आलेली नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे संबंधित संस्थेत गेले. त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांची भेट घेतली. या वेळी संस्थेत हा अभ्यासक्रम 1989 ते 2011 या कालावधीत सुरू ठेवण्यात आला होता. इन्स्टिट्यूटमार्फत खासगी व्यवस्थापनात उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारे कौशल्याभिमुख शिक्षण देण्यात आले आहे. तसेच 2012 पासून विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने अभ्यासक्रम बंद केले असल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले.

 इन्स्टिट्यूट स्वायत्त व खासगी असल्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाची वा संबंधित शिखर संस्थेच्या परवानगीची देखील गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु हा अभ्यासक्रम व्यवस्थापकीय विद्याशाखेशी संबंधित असल्याने याबाबतची परवानगी तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांकडून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. नारखेडे यांनी आपल्या अहवालात नमूद केले असून तो अहवाल शासनास पाठवला. त्यानंतर तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या द्विसदस्यीय समितीच्या मार्फत या संस्थेची 15 डिसेंबर रोजी चौकशी केली. यामध्ये संस्थेने एआयसीटीई, विद्यापीठ तसेच राज्य शासन यांची कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसून आले नाही. संस्थेकडून प्रवेश थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी संस्थेच्या वेब पोर्टलवर अद्यापही प्रवेश सुरू असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे संस्थेने सक्षम प्राधिकरणाकडून योग्य त्या मान्यता घेऊनच अभ्यासक्रम राबवावे अन्यथा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस द्विसदस्यीय समितीकडून करण्यात आली असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे.