होमपेज › Pune › जोडीदाराशी नियमित लैंगिक संबंधामुळे हृदयरोगापासून बचाव

ह्रदयरोगाची भीती वाटते; दूर राहण्यासाठी 'हे' करा!

Published On: May 20 2018 10:37AM | Last Updated: May 20 2018 10:37AMपुणे : प्रतिनिधी

ह्रदयरोगाची भीती वाटते... त्यापासून दूर राहायचे आहे. मग, आपल्या जोडीदाराशी नियमित लैंगिक संबंध ठेवा. असे केल्यास हृदयरोगापासून दूर राहता येऊ शकते, असा निष्कर्ष ‘जामा कार्डियॉलॉजी’ने केलेल्या संशोधनातून समोर आला आहे. तसेच आंघोळ करणे, पाय-या चढणे, 100 मीटर चालणे, कुटुंबीय किंवा मित्रांसमवेत गप्पागोष्टी करणे या प्रगत उपचार पध्दतीने ह्रदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे स्पष्ट झाले.

या अभ्यासात हृदयविकाराने पीडित 7 हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला. प्रगत उपचार पद्धतीमुळे रुग्णांमधील मृत्यूदर व हॉस्पिटलचा खर्च कमी होण्यास मदत झाल्याचे त्यामधून निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांच्या जीवनातही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. इतकेच नव्हे तर परदेशात झालेल्या संशोधनानुसार हृदयरोग असलेल्या रुग्णांना प्रगत उपचार दिल्याने त्यांचा हृदयविकाराचा धोका कमी झाला असून त्यांचा हॉस्पिटलचा खर्चही कमी झाल्याचे समोर आल्याची माहिती शहरातील ह्रदयरोगतज्ज्ञ देतात.

हृदयविकार ही जागतिक आरोग्यविषयक समस्या बनली आहे. जगभरातील जवळपास 26 दशलक्ष तर भारतातील 10 दशलक्ष लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. जगातील एकूण रुग्णांपैकी 32 टक्के रुग्ण एकट्या भारतातीलच आहेत. या आजारामुळे आरोग्यासाठी कराव्या लागणार्‍या खर्चांमध्ये वाढ झाली आहे. हृदयविकारावर दरवर्षाला जगभरात 12 हजार कोटी रुपये खर्च होत असून यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. नवीन प्रगत उपचार पद्धती हृदयविकार असणा-या 10 पैकी 7 रुग्णांना उपयुक्त ठरली असल्याची माहिती या विश्‍लेषणामधून समोर आली आहे. तसेच नियमितपणे केलेल्या उपचाराचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत.

तसेच निदानाच्या एका वर्षाच्या आतच हृदयविकारामुळे जवळपास 23 टक्के भारतीय रुग्णांचा मृत्यू होतो. याबाबत अधिक माहिती देताना कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएसआय) माजी अध्यक्ष डॉ. शिरिष हिरेमठ म्हणाले, ‘भारतात महामारी आजार म्हणून उदयास येत असलेल्या हृदयविकारावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

> भारतासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील मृत्यूदरामधील फरकासाठी कमी जागरुकता, आर्थिक भार, दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधांची उपलब्धता, पर्यावरणीय व अनुवांशिक घटक यांसारखे घटक कारणीभूत असू शकतात. यामुळेच हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचेही डॉ. हिरेमठ यांनी स्पष्ट केले. 

हे आहेत प्रगत उपचार

लैगिंक संबंध ठेवणे, आंघोळ करणे, पाय-या चढणे, 100 मीटर चालणे, कुटुंबियांना किंवा मित्रांना भेटणे, धावणे, बागकाम करणे, छंद जोपासणे, घरातील कामे करणे, हृदयविकाराबाबत माहिती ठेवणे.