Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Pune › ओ साहेब, पासपोर्ट ऑफिस कुठयं?

ओ साहेब, पासपोर्ट ऑफिस कुठयं?

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 1:18AM

बुकमार्क करा
पुणे : केतन पळसकर

शहरातील सेनापती बापट रोडवर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आहे. मात्र, हे कार्यालय शोधता-शोधता नागरिकांच्या नाकी नऊ येतात. कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या मुख्य रस्त्यावर, दर्शनी भागात कार्यालयाचा फलक पाहायला मिळत नाही. त्याऐवजी, कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या एका खाजगी हॉटेलचे फलक दर्शनी भागात जास्त पाहायला मिळतात. त्यामुळे, कार्यालयात येणारे नागरिक संभ्रमावस्थेत पडतात.

प्रवास, शिक्षण किवा परदेशात भ्रमंती करण्याकरिता पासपोर्ट अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शहरातील पासपोर्ट कार्यालय प्रादेशिक आहे. त्यामुळे, पासपोर्ट काढण्याकरिता किवा पासपोर्ट संबंधीच्या कामाकरिता परगावावरून नागरिक येत असतात. मात्र, नव्या शहरात आल्यानंतर रहदारीच्या मार्गावर असणार्‍या पासपोर्ट कार्यालयाचे फलक या नागरिकांना पाहायला मिळत नाहीत. त्याउलट, या कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या खाजगी हॉटेलचे फलक त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या प्रकारामुळे या कार्यालयात येणार्‍या नागरिकांची फसगत होते.

हे पासपोर्ट कार्यालय सेनापती बापट रोडवरील बालभारतीच्या इमारती शेजारी आहे. बालभारतीच्या इमारतीकडून कार्यालयाच्या शोधात नागरिक पुढे सरसावतात. मात्र, कार्यालयाचा फलक तिथे पाहायला मिळत नसल्याने नागरिक शोध घेताना दिसतात. एकीकडे पुणेरी पाट्यांकरिता शहर प्रसिद्ध आहे. या पाट्यांवरून पुण्याची खिल्लीदेखील उडविली जाते. याच पाट्यांच्या शहरात पासपोर्ट कार्यालय फलकाविना असल्याने त्या खिल्लीमध्ये आणखीनच भर पडते आहे. कार्यालयाजवळ, रस्त्याच्या दर्शनी भागात फलक लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.