Tue, Mar 26, 2019 20:11होमपेज › Pune › क्षेत्रीय समिती अध्यक्षांचे अधिकार वाढविणार

क्षेत्रीय समिती अध्यक्षांचे अधिकार वाढविणार

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:34AMपिंपरी  : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व 8 क्षेत्रीय समिती अध्यक्षांना सध्या फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे ते केवळ नामधारी असल्याप्रमाणे वावरत आहेत. परिणामी, क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात विकासकामे खोळंबून राहतात. अध्यक्षांच्या अधिकारात वाढ केल्यास क्षेत्रीय स्तरावर कामे वेगात मार्गी लागून शहराचा विकासाची गती वाढेल, असा निर्णय सर्व क्षेत्रीय समिती अध्यक्ष व अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात येत्या 8 दिवसांमध्ये आयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करणार आहेत. 

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात गुरूवारी (दि.28) झालेल्या बैठकीस महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विविध विषय समिती अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रीय समिती अध्यक्ष, क्षेत्रीय समिती अधिकारी व इतर अधिकारी आदी उपस्थित होते. क्षेत्रीय समिती व अध्यक्षांना पूर्वी काही अधिकार नव्हते. ते केवळ नामधारी होते. आता त्यांना केवळ 5 लाखांपर्यंतचे अधिकार आहेत. तरीही त्यांना नामकरणाशिवाय ठोस असे अधिकार नाहीत. तर, क्षेत्रीय अधिकार्‍यांना 25 लाखांपर्यंतचे अधिकार आहेत. मात्र, क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांमध्ये ताळमेळ व अधिकार मर्यादा स्पष्ट नसल्याने क्षेत्रीयस्तरावर काम होत नाहीत. कामांसाठी सातत्याने पालिका मुख्यालयातील अधिकार्‍यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील कामे प्रलंबित राहतात, अशी क्षेत्रीय समिती अध्यक्षांची तक्रार आहे. त्यामुळे त्याचे अधिकार वाढविण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी केली. 

अधिकार वाढविल्यास निर्णय प्रक्रियेस वेग येऊन क्षेत्रीय स्तरावर कामे मार्गी लागतील. त्यासाठी पालिका मुख्यालयावर अंवलबून राहण्याची मानसिकता बदलणार आहे. त्यामुळे  अध्यक्षांना 10 लाखांपर्यत अधिकार देण्याची मागणी बैठकीत केली गेली. त्या संदर्भात नियमावली तयार करण्याचा सूचना पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना दिल्या. त्याबाबत कायदे तपासून येत्या 8 दिवसांमध्ये आयुक्त या अधिकार्‍यांबाबत परिपत्रक प्रसिद्ध करतील, असे सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सांगितले. क्षेत्रीय समितीचे अर्थसंकल्पातील तरतुदीवरही क्षेत्रीय अध्यक्ष नाखूश आहेत. कचरा, आरोग्य, ड्रेनेज आदी समस्या त्यांनी बैठकीत मांडल्या. सुधारीत अर्थसंकल्प तयार करताना क्षेत्रीय समितीला अधिक निधी दिला जाईल, असे आश्‍वास पदाधिकार्‍यांनी दिले.

थेरगावात पावसाचे पाणी साचल्याने निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा

शहरात गुरूवारी (दि.21) झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचून नागरिक व वाहनचालकांचे मोठी गैरसोय झाली. विशेषत: थेरगाव परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली जाणून अक्षरशा नद्याचे स्वरूप आले होते. त्या बाबत ‘पुढारी’ने छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर बैठकीत चर्चा झाली. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये क्षेत्रीय समिती अध्यक्ष व अधिकार्‍यास निर्णय घेण्याचे अधिकार असल्यास तातडीने उपाययोजना करता येतात, असा मुद्दा उपस्थित केला गेला.