Thu, Jun 27, 2019 02:32होमपेज › Pune › सिव्हिल कोर्ट येथील मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा 

सिव्हिल कोर्ट येथील मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा 

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी 

वनाज ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचे काम सध्या जोमाने सुरू असताना सिव्हिल कोर्टापासून रामवाडीपर्यंतचे कामही महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रस्त्यामध्ये बॅरिकेटिंग टाकून माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे आता शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारग़ेट, वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते रामवाडी अशा तीनही पातळ्यांवर मेट्रो बांधकामाचे काम सुरू असणार आहे. सिव्हिल कोर्टाजवळील काम सुरू झाल्यामुळे या प्रकल्पाला गती प्राप्त होणार आहे. कारण याठिकाणी तीन इंटरचेंज मेट्रो  स्टेशनस असणार आहेत, अशी माहिती वनाज ते रामवाडी (रिच 2) चे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली आहे. 

सध्या वनाज ते सिव्हिल कोर्टापर्यंत लागणार्‍या 326 पिलरपैकी 103 ठिकाणच्या पिलरच्या पाया बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. तर 31 पिलर अर्ध्या उंचीपर्यंत पूर्ण झाले आहे. 

फूटपाथ मोकळे करण्याची प्रक्रिया सुरू

पौड रस्त्यावरील वनाज, आनंद नगर, आयडियल कॉलनी या तीन ठिकाणी मेट्रोचे स्टेशन असणार आहेत. मेट्रो स्टेशनसाठी  फुटपाथाच्या बाजूची जागा एन्टी आणि एक्झिटसाठी लागणार आहे. त्यामुळे हे फुटपाथ मोकळे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच ती पूर्ण होऊन मेट्रो स्टेशनच्या कामाला गती मिळणार आहे. 

30 वृक्षांचे पुनर्रोपन टेकडीवर करणार 

पौड रस्त्यावरील एकुण 30 झाडांना मेट्रो बांधकामासाठी हलवावे लागणार आहे. महामेट्रोला तशी परवानगी मिळाली असून लवकरच या झाडांचे पुनर्रोपन ‘एआरआय’ कंपनीच्या टेकडीवर करण्यात येणार आहे. मेट्रोचे बांधकाम जसजसे पुढे सरकणार आहे त्याप्रमाणे  झाडांना हलवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.