Sat, Feb 23, 2019 18:55होमपेज › Pune › प्रतिबिंब, थ्रीडी रांगोळ्यांची मोहिनी

प्रतिबिंब, थ्रीडी रांगोळ्यांची मोहिनी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

सर्वधर्मसमभावाचा संदेश देत गणरायाची मूर्ती साकारणारा कलाकार, हाती वीणा घेऊन वारीसाठी निघालेला वारकरी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी माधुरी, कृष्णाच्या भक्तीत लीन झालेली संत मीरा, प्रतिबिंब रांगोळीतून साकारलेले बाप्पा, 3 थ्रीडी स्वरूपात दिसणारे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांसह विविध आकर्षक रांगोळ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या सदुसष्टपूर्तीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने घोले रस्ता येथील राजा रवी वर्मा कलादालन येथे ‘इंद्रधनु’ या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते झाले. या वेळी, जगदीश चव्हाण, विजय फळणीकर, अक्षय शहापूरकर आदी उपस्थित होते. 

या वेळी योगेश सोमण म्हणाले, रंगावलीकाराला अनुभव आणि विचारातून जे भावते तो ते रांगोळीच्या माध्यमातून इतरांना दाखवितो. त्याची ताकद ही दोन चिमटीत असते. धूलिकण असलेली रांगोळी जेव्हा सृजनात्मक दोन बोटांमधून उमटायला लागते. त्यावेळी, ती एवढी उत्तम कलाकृती तयार होते की तिला माथी लावण्याची इच्छा जागृत होते. आजच्या घडीला रंगावली हे चित्रकलेचे श्रेष्ठतम माध्यम आहे. रांगोळी ही अल्पायुषी आहे. मात्र, ती एकदा नजरेत आली तर ती पाहणार्‍यांच्या स्मृतीत राहाते.  

राजा रवी वर्मा कलादालनात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात सामाजिक संदेश देणार्‍या विषयांमध्ये पाणी वाचवा, अंधश्रद्धा, वृध्दाश्रम, बालकामगार, स्वच्छ भारत, कचरा नियोजन, सर्वधर्मसमभाव यांचा समावेश आहे; तसेच बालपण, मातृत्व, भक्ती, प्रेम आणि वासना तसेच स्थिर चित्र, निसर्गचित्र, थ्रीडी रांगोळी इत्यादी सुमारे 30-32 विषय रांगोळ्यांमधून साकारले आहेत. हे प्रदर्शन 22 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सर्वांना पाहता येणार आहे.