Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Pune › दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी अवघ्या दोनच दिवसांत कोरडी

दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी अवघ्या दोनच दिवसांत कोरडी

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 12:47AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

बीज सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर धरणातून पाणी सोडल्यामुळे देहूत दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी अवघ्या दोनच दिवसांत पुन्हा कोरडी पडली आहे. सुदुंबरेजवळील बंधार्‍याचे गेट तुटल्यामुळे नदीपात्रातील सर्व पाणी वाहून गेल्याची कबुली पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र, आता दुरुस्ती झाली असून, बीज सोहळ्यापर्यंत पर्याप्त पाणी नदीत पोहचेल, अशी खात्री अधिकार्‍यांनी दिली आहे. 

बीज सोहळ्यापूर्वी चार-पाच दिवस आधीच धरणातून नदीत पाणी सोडण्याची घाई यंदा पाटबंधारे विभागाच्या अंगाशी आली आहे. सुदुंबरेजवळ नदीवरील बंधार्‍याचे गेट तुटल्यामुळे नदीपात्रातील पाणी वाहून गेले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी दुथडी भरून वाहणार्‍या इंद्रायणीचे पात्र आता कोेरडे पडले आहे. या प्रकारामुळे यात्रा नियोजनात महत्त्वाची भूमिका असणार्‍या संस्थानची चिंता वाढली आहे. संस्थानने याबाबत आज झालेल्या बैठकीत संबंधितांना जाब विचारल्यावर ही हकिकत समोर आली. 

या वेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, बंधार्‍याजवळ चर खोदण्याचे खासगी काम सुरू आहे. या कामामुळे बंधार्‍याचे गेट तुटले असून नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेले. प्रशासनाच्या वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत येथील दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. संबंधित चर खोदण्याचे काम बंद करण्यात आले. नदीतून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वेग वाढविण्यात आला आहे. सध्या 750 क्युसेक्स वेगाने वडीवळे धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आज रात्रीपर्यंत पुन्हा नदीपात्र भरून जाईल, अशी खात्री अधिकार्‍यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, देहुतील स्वयंसेवी संस्थांच्या वतीने नदीपात्रात जलपर्णी वाहून येऊ नये यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षी रात्री दोनच्या सुमारास नदीपात्रात पाणी पोहचले, एवढ्या रात्री स्वयंसेवकांनी नदीपात्रात दोर लावून सकाळपर्यंत पात्र जलपर्णीमुक्त केले. यावर्षीही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ मुुसुडगे यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. यावर्षीही स्वयंसेवक तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बहुतांशी मिटला आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, त्याद्वारे आता जादा दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. जुनी व वापरात नसलेली नळकोंडाळी दुरुस्ती करून यात्रेसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती धनंजय जगधने यांनी दिली.