Sat, Jul 20, 2019 13:16होमपेज › Pune › ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा पुनर्वापर शक्य!

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा पुनर्वापर शक्य!

Published On: Apr 19 2018 6:51PM | Last Updated: Apr 19 2018 6:36PMपुणे : प्रतिनिधी

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) पुर्नवापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या प्रचंड प्रमाणात निर्माण होणार्‍या कचर्‍याची समस्या सोडवणे येत्या काळात शक्य होणार आहे.

पीओपीचा वापर करून तयार करण्यात येणार्‍या विविध कलाकृती व सजावट ही आकर्षक असतेच. मात्र, या पीओपी कलाकृतीचा पुन्हा वापर होत नसल्याने त्याचा कचरा होवून त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या समस्येवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स पार्क विभागाने तोडगा काढला आहे. सायन्स पार्कने शोधून काढलेल्या या प्रणालीनुसार पीओपी भाजणे, दळणे, चाळणे अशा सोप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्या तर त्यापासून पुन्हा एकदा पीओपीच्या मूर्ती वा अन्य कलाकृती बनवता येणे शक्य आहे, अशी माहिती या प्रयोगाचे संचालक व विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. जयंत गाडगीळ यांनी दिली. 

गाडगीळ यांच्या समवेत या प्रकल्पामध्ये त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के याचा देखील सहभाग आहे. सायन्स पार्क विभागाकडून या संदर्भात गेल्या वर्षी (२०१७) एक टन पीओपीवर प्रक्रिया करण्यात आली होती. आणि त्यापासून ८०० किलो पीओपी पुन्हा वापरण्या योग्य करण्यात यश आले.

पीओपीच्या वापराने घरगुती सजावट, भव्य स्टेजची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यात येतात. यासाठी हजारो टन पीओपी वापरला जातो. याशिवाय केवळ पुण्यातच पीओपीपासून बनविलेल्या सहा लाख गणेशमूर्तीचे गेल्या वर्षी विसर्जन झाले. महाराष्ट्रात तर ही संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. .पीओपीच्या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर त्यांचे काय व कसे व्यवस्थापन करायचे, ही समस्या दरवर्षी उद्भवत असते. पीओपीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. यावर काय उपाय योजना करायची यांचा गंभीर प्रश्न आहे. कारण पीओपी किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आत्तापर्यंत मानण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन अत्यंत उल्लेखनीय आहे.

या उपायाची वैशिष्ट्‌ये पुढीलप्रमाणे आहेत...

१. पीओपीचा पुनर्वापर शक्य असल्यामुळे त्याचा पर्यावरणावर पडणारा ताण कमी होतो.
२. मूर्ती विसर्जनामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टळते.
३. मिळणार्‍या पीओपीचा नक्षीकाम, खोलीला रंगकाम करण्यापूर्वी भिंती लिंपणे, तसेच इतर सजावटीसाठी  वापर करता येतो.

अर्थिक पाठबळाची अपेक्षा...

हा प्रकल्प केवळ प्रायोगिक पातळीवर न राहता प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात यावा, अशी अपेक्षा डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी आता आम्हाला पाठबळ देऊ शकणार्‍या संस्था, गणेशमंडळे, स्वयंसेवी संस्थांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे; तसेच या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे गाडगीळ म्हणाले.