Mon, Apr 22, 2019 12:41होमपेज › Pune › अपात्र गुरुजींची संस्थांमध्ये भरती

अपात्र गुरुजींची संस्थांमध्ये भरती

Published On: Jun 12 2018 1:46AM | Last Updated: Jun 12 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करावी, अशी मागणी हजारो पात्र शिक्षकांनी केली आहे. तर वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी भरती करावी, या मागणीसाठी आठवडाभरापासून सेट, नेट, पीएच.डी पात्रताधारक उपोषण करीत आहेत, याकडे लक्ष न देता शिक्षक तसेच प्राध्यापक भरतीच्या केवळ घोषणा करण्यात येतात. मात्र शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये सध्या पात्रता नसलेले गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे अपात्र गुरुजींची शाळेत भरती आणि पात्र शिक्षक मात्र भरतीसाठी रस्त्यावर असे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र याचे कोणालाही गांभीर्य नसून शिक्षक भरतीच्या केवळ वल्गनाच केल्या जात असल्याचा आरोप संबंधित पात्र तरुणांकडून करण्यात येत आहे.

बालकांचा सक्‍तीच्या व मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक हा शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. मात्र शाळांमध्ये शिकवत असलेले अनेक शिक्षक हे टीईटी उत्तीर्णच नसल्याचे दिसून येत आहे. तर वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदावरील प्राध्यापकांना सेट, नेट किंवा पीएच.डी पात्र असणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक प्राध्यापक हे पात्रता नसताना देखील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून मुकावे लागत आहे, तर दुसरीकडे याच लोकांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापनदेखील होताना दिसत नाही. शिक्षण विभागातील अधिकारी आणि संस्थाचालक यांच्या संगनमताने हा ‘उद्योग’ सुरू असल्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पात्र शिक्षक तसेच प्राध्यापकांची वानवा असल्याचे दिसून येत आहे. तर शिक्षण विभाग मात्र यासंदर्भात हात झटकताना दिसून येत आहे.