Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › हुश्श! शिक्षक भरतीचे बिगुल वाजले

हुश्श! शिक्षक भरतीचे बिगुल वाजले

Published On: Jun 22 2018 1:18AM | Last Updated: Jun 22 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी 

अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणीच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येणार्‍या शिक्षक निवडीची प्रक्रिया शासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे 2012 नंतर बंद झालेल्या शिक्षक भरतीवरील बंदी उठणार असून विद्यार्थ्यांना आता पवित्र पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.त्यामुळे अखेर शिक्षक भरतीचे बिगुल वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 2012 नंतर शिक्षक भरती केलेली नाही. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलद्वारे होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

या भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा निकाल देखील जाहीर झाला आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी आणि शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी, यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुमारे 24  हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे.

पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी www.education.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अभियोग्यता चाचणीचा परीक्षा क्रमांक हा लॉगीन आयडी म्हणून वापर करावा आणि पासवर्ड स्वत: तयार करावा. पासवर्डची प्रक्रिया मोबाईलवरील ओटीपी टाकून करावी. नोंदणी वैयक्तिक माहिती व अर्ज त्यात भरायचे आहेत. सेल्फ अ‍ॅटे÷स्टेड केल्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही. अभियोग्यता चाचणीतील जात, जन्मतारीख यामध्ये बदल करता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी दिली आहे. त्यांना माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती भरत असताना काही चुकीचे होत असेल तर त्याबाबत जिल्हा परीषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणअधिकार्‍यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रत उमेदवाराने जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्राप्त प्रिंटवर वॉटरमार्क आणि शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या स्वाक्षर्‍या बंधनकारक करण्यात आल्या आहेत.संस्था व शाळांनी पोर्टलवर माहिती भरण्याची तयारी करावी असे देखील कळविण्यात आले आहे.2017-18 ची संचमान्यता अद्ययावत करून त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात करावे. रिक्त आणि अतिरिक्त जागांची माहिती पोर्टल सुरू झाल्यानंतर भरण्यात येणार आहे. पदे कमी असल्यास संस्थेचा अनुशेष त्या त्या शिक्षणाधिकार्‍यांकडून तपासून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जागा आणि भरतीबाबत मात्र गुप्तता 

शिक्षक भरतीसाठी नेमक्या किती जागा भरण्यात येणार आहेत आणि शिक्षक भरतीची तारीख याबद्दल मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे एकंदतरीत पध्दतीबाबत मात्र शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.