Thu, Jun 27, 2019 10:10होमपेज › Pune › कर्जमाफीतील अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली

कर्जमाफीतील अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेल्या रकमेची खातरजमा करण्यासाठी सहकार विभागाकडून नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित बँकांमध्ये जाऊन शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. अपात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्‍कम जमा झालेली आढळल्यास, अशी रक्कम संबंधित बँकेंकडून वसूल करण्यात येणार आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांत ही मोहीम हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. सद्यःस्थितीत 36 लाख शेतकर्‍यांना 15 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. बँकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शासनाने कर्जमाफीचा लाभ संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केलेला आहे. कर्जमाफी योजनेचे निकष बँकांना सहकार विभागाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण घेऊन, समजून देण्यात आलेले होते. त्यासाठी शासनाचे शासन निर्णय, परिपत्रके बँकांना देण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले.

बँकांच्या तपासणीसाठी सहकार विभागाकडून लेखापरीक्षकांना 32 रकान्यांचा तक्ता तयार करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या सोळा रकान्यांमध्ये बँकांकडून सहकार विभागाला कर्जमाफी देण्यासाठी प्राप्त झालेल्या पात्र शेतकर्‍यांच्या माहितीचा समावेश राहील; तसेच त्यापुढील 16 रकान्यांमध्ये प्रत्यक्षात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा समावेश असून, खरोखरच ती योग्य पद्धतीने करण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत माहिती त्यात भरण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून 85 लेखापरीक्षकांची नावे राज्य शासनाकडे पाठविण्यात आली असून, त्यास मान्यता मिळताच लेखापरीक्षणाची कार्यवाही महिनाअखेर सुरू होण्याची अपेक्षा असल्याचेही सूत्रांकडून  सांगण्यात आले. 

कर्जमाफी योजनेत 1 एप्रिल 2012 रोजी व त्यानंतर घेतलेले पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज आणि त्यापैकी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना  दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना शासनाने जाहीर केली, तर दीड लाख रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम असलेल्या शेतकर्‍यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात आली. त्यामध्ये थकबाकीदार शेतकर्‍याने दीड लाखांच्या वरील रक्‍कम भरल्यास त्यांचे दीड लाखांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे; तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती.