पुणे : शंकर कवडे
देशभरात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने बासमती व बिगर बासमती तांदळाच्या भरघोस उत्पादनातून भारताने विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा देशभरात तांदळाचे 9 कोटी 40 लाख टन उत्पादन झाले आहे. 84 लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करून भारताने थायलंड, चीन व मलेशियाला मागे टाकले आहे. तर, 40 लाख टन बासमतीची निर्यात करीत भारताने येथेही अव्वल स्थान पटकावले आहे. निर्यात व उत्पादनाचा एकत्र विक्रम नोंदविण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये देशासह परदेशातील नागरिकांकडून भारतीय बासमती तसेच बिगर बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. तांदळाचा दर्जा, रंग, चव, चिकटपणा आदी गुणवैशिष्ट्यांमुळे भारतीय तांदूळ परदेशातील बाजारपेठांमध्ये वर्चस्व निर्माण करत आहे. यंदा देशातील 37 तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने उत्पादन चांगले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बासमती व बिगर बासमती तांदळाच्या उत्पादनात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतीय तांदळाला परदेशी नागरिकांसह परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय तसेच आशिया खंडातील नागरिकांकडून मागणी वाढल्याने बासमतीची निर्यात 2 ते 3 टक्क्यांनी, तर बिगर बासमती तांदळाची निर्यात तब्बल 40 टक्क्यांनी वाढली आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश, आदी राज्यातून पारंपरिक बासमती तांदळासह 1121, 1401, 1509 या तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेशात मसुरी, सोनामसुरी, कोलम, लचकारी, चिन्नोर, कालीमुछ, आंबेमोहोर, एचएमटी कोलम आदी तांदळाचे उत्पादन घेण्यात येते. राज्यात नाशिक, कोकण, पुणे आणि नागपूरच्या काही भागात साधारणत: इंद्रायणी, कोलम आणि आंबेमोहोर, आदी जातीच्या तांदळाचे मोठ्या प्रमाणात झाले असल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.
साधारणत: भारतीय बाजारपेठांमध्ये 1 नोव्हेंबरपासून बासमती 1121 या तांदळाची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर आठ दिवसांनी 1509, सुगंधा तर 10 डिसेंबर पासून पारंपरिक बासमतीचे बाजारात आगमन झाले. तर बिगर बासमतीची 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत आवक झाली. बिगर बासमती प्रकारात गुजरात येथून सर्वप्रथम कोलमची सुरवात झाली. त्यानंतर प्रत्येक राज्यामधून तांदळाचे उत्पादन निघण्यास सुरवात झाली. यंदा जाने. ते डिसें. 2017 या काळात बिगर बासमतीच्या निर्यातीत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 60 लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. यंदा हा आकडा 84 लाख टनापर्यंत गेला असल्याचे शहा यांनी सांगितले.