Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनास  मान्यता

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनास  मान्यता

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी होणार्‍या श्री छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्‍तीय मान्यता देण्यात आली आहे. मुंबई येथे दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शासनानेही मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले.मागील आठवड्यात दिल्‍लीमधून विमानतळाच्या साईटला ‘क्‍लिअरन्स’ मिळाल्यानंतर मुंबईमध्ये देखील हालचाली सुरू झाल्या होत्या. या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 2367 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. याकरिता अंदाजे 3513 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या खर्चास प्रशासकीय व वित्‍तीय मान्यता देण्यात आली आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली असून, पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाचीवाडी या सात गावांतील सुमारे 2367 हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत सादर केला होता. 

विमानतळाच्या भूसंपादनासाठी होणारा खर्च, नागरी विमानचालन, विमानतळ सार्वजनिक क्षेत्रातील इतर उपक्रमांना सहाय्य योजना, विमानतळ विकास कंपनीस सहायक अनुदाने, या उद्दिष्टांखाली संबंधित आर्थिक वर्षात उपलब्ध अर्थसंकल्प तरतुदीतून भागविण्यात यावा, अशा सूचना जैन यांनी दिल्या. यापूर्वी राजगुरुनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा काढलेला निर्णय राज्यशासनाने रद्द केला आहे. याकरिता 200 कोटी रुपये बीज भांडवल उनदान मंजूर करण्यात आले होते. हा आदेशही शासनाने रद्द केला आहे. त्यानंतर बीज भांडवल म्हणून 95.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही रक्‍कम आता पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वर्ग करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारकडून पुरंदर विमान तळासाठी लागणार्‍या अनेक प्रकारच्या परवानगी मिळत आहेत. काही खात्याची परवानगी मिळणे बाकी आहे. त्या लवकरच मिळतील असा विश्‍वास विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश ककाणी यांनी सांगितले.