Sat, Apr 20, 2019 07:55होमपेज › Pune › महाराष्ट्र दिनापासून रेशनिंग विक्रेत्यांचा ‘बेमुदत संप’

महाराष्ट्र दिनापासून रेशनिंग विक्रेत्यांचा ‘बेमुदत संप’

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:24AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

राज्यातील हजारो रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांना प्रतिमहा 40 हजार रुपये मानधन सुरू करण्याचा ठराव रेशनिंग विक्रेत्यांच्या दोन्ही शिखर संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. येत्या दोन महिन्यांत राज्य सरकारने या ठरावाची अंमलबजावणी न केल्यास दोन्ही संघटनांचे सभासद 1 मे 2018 पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे. 

राज्यभरातील रेशनिंग व केरोसीन विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन आणि ऑल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघ या दोन शिखर संघटनांची संयुक्त राज्यस्तरीय बैठक आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे शनिवारी (दि.30) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर आणि महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील 350 जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. 

या बैठकीत मार्गदर्शन करताना काकासाहेब देशमुख म्हणाले की, दोन्ही संघटनांमधील दुहीचा राज्य सरकारकडून गैरफायदा घेतला जात होता; मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर दोन्ही संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. सर्वांच्या भल्यासाठी आपापसातील मतभेद व गैरसमज बाजूला ठेवून आपण सर्व जण एकत्र येऊन सरकारला आपली ताकद दाखवून आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू. 

एखाद्या कारणामुळे कंपनीतील कामगाराला नोकरी गमावावी लागल्यास, कंपनीकडून नुकसानभरपाई व इतर सामाजिक सुरक्षा फायदे त्याला आर्थिक स्वरूपात अदा केले जातात; मात्र केरोसीनचा कोटा कमी झाल्याने राज्यभरातील पाच हजार केरोसीन विक्रेत्यांना याचा फटका बसला आहे; मात्र जीवनावश्यक वस्तू कायदा अस्तित्वात असूनही, राज्य सरकारकडून त्याला एक दमडीचीही नुकसानभरपाई दिलेली नाही. या केरोसीन विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना गॅस एजन्सी देण्याची आमची आग्रही मागणी आहे. 

गजानन बाबर म्हणाले की, यापूर्वी फेडरेशनच्या वतीने विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कासाठी आतापर्यंत तीन वेळा आंदोलने करण्यात आली; मात्र दोन्ही संघटनांमधील दुहीचा गैरफायदा घेत राज्य सरकारने ही आंदोलने यशस्वी होऊ दिली नाहीत. त्यामुळे या दोन्ही संघटनांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. आता या संघटनांच्या एकत्र येण्यामुळे विक्रेत्यांचे प्रश्‍न सुटण्यास फारसा वेळ लागणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विजय गुप्ता यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.